मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आझाद मैदानातील दसरा मेळाव्यात नेहमीचेच रडगाणे गायले. त्यांच्या भाषणात कोणताही नवा मुद्दा नव्हता. मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही प्रकारचे व्हिजन नव्हते. राज्यात महिलांवर अत्याचार, लेकींवर बलात्कार आणि कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याच्या पार्श्वभूमीवर मिंधे सरकारविरोधात राज्यात संतापाचे वातावरण आहे. जनता पेटून उठली आहे… असे असतानाही त्यावर बोलण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता महायुतीला मोठे करणार असा भाबडा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.
जिकडे तिकडे रिकाम्या खुर्च्या
जितक्या मोठ्या प्रमाणावर मेळाव्याची दणदणीत अशी जाहिरात करण्यात आली होती. त्या तुलनेत मिंधे गटाचा दसरा मेळावा म्हणजे निव्वळ फ्लॉप शो ठरला. जिकडे तिकडे केवळ रिकाम्या खुर्च्याच दिसत होत्या. सायंकाळ झाली तरी आझाद मैदानाकडे जाणारे जथे वगैरे असे कुठल्याच प्रकारचे चित्र नव्हते. या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.