
शीव-कोळीवाडय़ातील भाजपच्या बंडखोर उमेदवाराने माघार न घेतल्याने शिंदे गटाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
प्रतीक्षानगर येथील प्रभाग क्र. 173 महायुतीच्या जागावाटपात भाजपने शिंदे गटाला दिला. तरीही येथून भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म सादर केला. त्यावर आक्षेप शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांनी आक्षेप घेतला. त्याची दखल न घेता निवडणूक अधिकाऱयाने केळुसकर यांचा अर्ज स्वीकारला. याविरोधात कांबळे यांनी याचिका दाखल केली आहे.
पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करून केळुसकर यांनी अर्ज भरल्याने तो बाद करावा, अशी मागणी करत कांबळे यांनी याचिका दाखल करून तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर केली. मात्र न्यायालयाने नकार दिला.
कमळ देऊ नका
केळुसकर यांना निवडणुकीसाठी भाजपचे कमळ चिन्ह देण्यास मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली.
कांबळे यांच्या याचिकेसह अन्य काही निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. या याचकिांवरही तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.



























































