केडीएमसीवर शिंदे गटाची सत्ता; पाणीटंचाईविरोधात भाजपचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण पूर्वमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप – शिंदे गटाची सत्ता असून शिंदे गटाचा महापौर आहे. पाणीटंचाईवर मार्ग काढण्यात शिंदे गटाला अपयश आल्याचा निषेध करत सत्तेतील भागीदार भाजपनेच केडीएमसीवर मोर्चा काढला. पाणीटंचाई कधी संपणार, असा आक्रोश करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढून नगरसेवक मनोज राय आणि पूजा गायकवाड यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. कल्याण पूर्वेतील शेलेपाडा, कैलासनगर, नेहरूनगर, खडेगोळवली, विठ्ठल वाडी आदी भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या आहे. काही ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मोर्चादरम्यान संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिका कर वेळेवर भरूनही पिण्याचे पाणी मिळत नसेल तर कर भरण्याचा काय उपयोग, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.

‘चक्का जाम’चा इशारा
पाणी देऊन जगवता येत नसेल तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला ठार मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलक महिलांनी केली. आठवडाभरात पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावला नाही तर कल्याण पूर्वेत ‘चक्का जाम’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.