
महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार गट यांनी आमच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा मागून जाणीवपूर्वक अडवणूक केली. त्यामुळे आम्हाला निर्णय प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले असून, आता आम्ही अहिल्यानगर मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे अनिल शिंदे आणि संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनिल शिंदे म्हणाले, महायुती टिकावी यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. जागांबाबत काही अदलाबदल करण्याचेही आम्ही सुचवले होते. चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करताना आमच्या काही विद्यमान नगरसेवकांना पक्षाचा फॉर्म देणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय नितीन कुंकूलोळ यांनी ‘तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढा’ असा निरोप दिला. या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजी कदम म्हणाले, भाजप आणि शिंदे गट ही महाराष्ट्रात नैसर्गिक युती आहे. युती टिकावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मात्र, आज फोनवरून युती तुटल्याचे कळवण्यात आले. आता आगामी निवडणूक स्वबळावरच लढणार आहोत.
शेवटच्या क्षणी निर्णय
शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे आज पहाटेपर्यंत चर्चा सुरू होत्या. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. आमच्याकडे 150 हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. तसेच भाजप किंवा अन्य पक्षांतून चांगले उमेदवार आले, तर त्यांचाही विचार केला जाईल, असे शिंदे व भोर यांनी स्पष्ट केले.
भाजप–राष्ट्रवादीने महायुती तोडली
महायुती आम्ही तोडलेली नाही, ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच तोडली आहे, असा थेट आरोप शिंदे आणि भोर यांनी केला. अनिल शिंदे गेली 15 वर्षे नगरसेवक आहेत. प्रशांत गायकवाड विद्यमान उमेदवार असताना या दोघांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. आमचे नगरसेवक निवडून आलेले प्रभाग 11, 12 व 15 येथील जागा भाजप व अजित पवार गटाने मुद्दाम मागितल्याने अडवणूक स्पष्ट दिसून आली, असा आरोप करण्यात आला.

























































