
शिरदाळे ( ता. आंबेगाव ) येथील शिरदाळे- धामणी घाटात रविवारी मध्यरात्री अपघात झाला. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून या घटनेत चालक आणि वाहक व बटाटा व्यापारी बचावले.
गुळाणी येथून बटाट्याने भरलेला टेम्पो श्रीगोंदा या ठिकाणी चालला असताना साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास टेम्पो शिरदाळे घाटात पलटी झाला. यात टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून चालक, वाहक तसेच व्यापारी थोडक्यात बचावले आहेत. गेल्या वर्षभरातील हा तिसरा ते चौथा मोठा अपघात असून शिरदाळे ग्रामपंचायत,धामणी ग्रामपंचायत यांच्या वतीने वारंवार सिमेंट कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात येत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कठडे बसवावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान मध्यरात्रीच्या वेळ असताना देखील अपघाताची माहिती सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांना समजताच त्यांचे पती अजित बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना उपचारासाठी पारगाव येथे दवाखान्यात दाखल केले. त्यातील एकाला गंभीर दुखापत असून दोघांना किरकोळ दुखापत आहे. या रस्त्याचे काम झाल्यापासून या रस्त्याने वर्दळ वाढली आहे. शिरदाळे येथील शाळेतील विद्यार्थी, महिला मजूर, शेतकरी यांची कायमच वर्दळ या रस्त्याला असते आम्ही दोन्ही ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुन्हा निवेदन देण्यात येणार असून आता तरी दखल घेऊन हे काम मार्गी लावावे अशी मागणी धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी केली आहे.


























































