बनावट दर्शन पासेस विकणाऱ्य़ांवर होणार कठोर कारवाई, साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर पास उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साईभक्तांनी फसवणूक व होणारी गैरसोय टाळण्याकरिता संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन दर्शन पास उपलब्ध करून निर्धारित वेळेतच ‘श्रीं’च्या दर्शनाकरिता यावे. इतरत्र खासगी व्यक्तीकडून दर्शन पासेस घेऊ नये. बनावट व जादा रकमेत दर्शन पासेस विकणाऱ्य़ांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा साईबाबा संस्थानकडून देण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या आदेशाने 7 ऑक्टोबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजून कोरोनाचे सावट संपले नसून, सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्रींच्या दर्शनाकरिता मर्यादित संख्येने भाविकांना दर्शन देण्यात येत आहे. त्यामुळे साईभक्तांनी श्रींच्या दर्शनाकरिता येताना संस्थानच्या संकेतस्थळावरून आगाऊ ऑनलाइन दर्शन पास घेऊनच यावे.

साईबाबा संस्थानच्या वेबसाईटद्वारे सशुल्क व मोफत दर्शन पास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्याचे तारखेपासून पुढील 5 दिवसांसाठी उपलब्ध असेल; तसेच प्रत्येक आरतीला प्रथम येणाऱ्य़ा शिर्डी ग्रामस्थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड पडताळून 10 पासेस साई उद्यान निवासस्थान येथून, तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील 16 गुंठे शताब्दी मंडप येथील काऊंटरवर दिले जात आहेत.