शिर्डी येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा, तीन आरोपी ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळील निमगाव कोराळे हद्दीत हेलिपॅड रोडला एका ठिकाणी अवैधपणे घरगुती गॅस सिलेंडरची मारुती व्हॅन या वाहनांत गॅस भरत असल्याचं उघड झालं आहे. ही माहिती गुप्त खबऱ्याकडून शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी आपल्या पोलीस पथकांसह या ठिकाणी आज छापा टाकला. तेव्हा तेथे सदर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

शिर्डीत अनेक वाहने ही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून चालवली जातात. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर हे अशा वाहनांना गुपचूपपणे विक्री करून काळ्या बाजाराने पैसे कमावला जातो. हा कायदेशीर गुन्हा असताना तो गेल्या अनेक दिवसांपासून सर्रासपणे सुरू होता. शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी इरफान शेख, अशोक शिंदे, दिनेश कांबळे, आप्पासाहेब थोरमिसे यांनी पोलीस पथकासह येथे छापा टाकल्यानंतर असे अवैध वाहनांना गॅस भरून देणारे दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 35 घरगुती गॅस टाक्या तसेच 10 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत तसेच संदीप पांडुरंग मते (वय 39 रा. कातोरे वस्ती निमगाव तालुका राहाता), अनिस मोहम्मद सय्यद (वय – 48 रा. श्रीरामनगर शिर्डी ता. राहाता), विवेक राजेंद्र आव्हाड (रा. चांगदेवनगर निमगाव ता. राहाता) या आरोपिंना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने, गॅस टाक्या, मशीन असा एकूण 7,07,095 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3, 7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. झालेल्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके व शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत.