अय्या आणि इश्श!

1495

>> शिरीष कणेकर

स्त्रीचं स्त्रीत्व कशात असतं? ते कशात शोधायचं असतं? ते कुठे आढळतं? एकच प्रश्न मी फिरवून फिरवून विचारलाय.

माझ्या माहितीतल्या एक सुविद्य, सुगरण व सुदृढ पुरंध्री नाकाचा कानोला करून मला म्हणाल्या, ‘‘आम्हाला नाही आमच्या आईनं ‘अय्या’ आणि ‘इश्श’ म्हणायला शिकवलं.’’ (‘नाही’ आणि ‘आमच्या’ या दोन शब्दांमध्ये ‘बाई’ हा शब्द तिनं घातला असता तर माझ्या कानांना बरं वाटलं असतं, पण माझ्या कानांची तिला काय पडल्येय? आईनं दाखवलेली पाऊलवाट तुडवत ती गजगामिनी निघाली. आपल्या पायाखाली स्त्रीत्व चिरडलं जातंय याची तिला तमा नव्हती).

‘‘अरे वा!’’ ‘देखो कैसे कैसे बांके जवान आये है’ असे कबड्डीच्या सीनला ‘गंगा जमना’त म्हणताना वैजयंतीमालाचा चेहरा कौतुकानं डवरून येतो तसा चेहरा करून मी म्हणालो.
‘‘वितभर जिवणी फाकून व तोंड वेंगाडून कोणी पोरी ‘अय्या’ आणि ‘इश्श’ म्हणाल्या की, मला त्यांच्या दोन थोबाडीत माराव्याशा वाटतात.’’ पुरंध्री पचकली.
‘‘अर्थातच’’ मी चमचा ढवळला, ‘‘तमाम स्त्रीवर्गाला परंपरेच्या शृंखलेतून मुक्त करणाऱया तुमच्या व तुमच्या तेवढय़ाच मातब्बर आईच्या अण्णासाहेब कर्व्यांच्या तोडीच्या योगदानाची इतिहास नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही.’’

खरं म्हणजे मला मूलभूत प्रश्न पडला होता. मुलींना ‘अय्या’ व ‘इश्श’ म्हणायला त्यांच्या आया शिकवतात? म्हणजे त्या शाळेतून आल्या की, काहीतरी खाऊन पाटावर बसतात व मग त्यांच्या आया त्यांना सांगत असतील- ‘‘समजा, तुझी ताई शिंप्याकडे कपडे शिवायला टाकायला म्हणून गेली आणि तशीच त्यांचा हात धरून पळून गेली हे कळल्यावर तू काय म्हणशील? अय्याsss तुझ्या बाबांनी मोलकरणीला घरातच आणून ठेवलं तर काय म्हणशील? इश्श, ही काय मोलकरणीचा पगार वाचवण्याची रीत? आलं लक्षात? बसा आता घोकत…’’

‘अय्या’ आणि ‘इश्श’ हे दोन अर्थहीन तरीही अर्थवाही असलेले दोन जादुई शब्द परमेश्वरानं स्त्रीवर्गाला बहाल केलेत. अत्यंत सहजगत्या व उत्स्फूर्तपणे येणारे ‘अय्या’ आणि ‘इश्श’ हे स्त्रीचे अलंकार आहेत. ते त्यांच्या ओठी चपखल बसतात व शोभतात. ते ओरबाडून स्त्री शब्दसंग्रहातून काढून टाकणे हा शुद्ध नतद्रष्टपणा आहे. तुम्ही काय देवाची चूक सुधारताय? ‘अय्या’ आणि ‘इश्श’ हे कोमल शब्द स्त्रीच्या मुखातून काढून पुरुषाच्या मुखी ‘इंप्लांट’ करण्याचा एखादा महाराष्ट्रव्यापी कट तर चुनाभट्टी किंवा कांजूरमार्ग किंवा निगडी येथे शिजत नाही ना? कल्पना करा की, पी. व्ही. सिंधूनं फायनल मारल्येय ही बातमी कानावर आल्यावर एखादा जवान, गब्रू पोरगा म्हणतोय- ‘‘अय्याsss’’ आपले कानाचे पडदे फाटणार नाहीत का? म्हण आहे ना आपल्याकडे- ‘ज्यांचं काम त्यानं करावं, बीजा करे सो गोता खाय!’

एका दिवाळी अंकात एका तथाकथित मुक्त स्त्रीनं (तो काय बायकोला सोडतोय, तिनंच नवऱयाला सोडलं होतं!) लिहिलं होतं, ‘‘नवरा तसा गरीब होता बिचारा. माझे लाडबिड करायचा. एकदा म्हणाला, ‘मला मटण आवडतं. तू कर.’ ती ताडकन म्हणाली, ‘तुला आवडतं तर तू कर. मला कशाला सांगतोस?’’

क्या बात है! समजा तो म्हणाला असता की, ‘‘मला मूल हवंय’’, तर ती ताडकन म्हणाली असती, ‘‘तुला हवंय तर तू जन्म दे. मला कशाला सांगतोस?’’

भयचकित नमावे तुज रमणी
कायम शर्टपँटीत राहणाऱया एका पत्नीला पार्टीला जाताना पती म्हणाला, (तोच तो दिवाळी अंक) ‘‘आज साडी नेस की.’’
‘‘तुला आवडते तर तू नेस. तुला कोणी अडवलंय?’’ पत्नी चिवचिवली.

स्त्रीचं स्त्रीत्व उजळून टाकणारे किमान तीन पुरुषदुर्लभ असे गुण मी सांगू शकतो.

(1) लज्जा- गाल आरक्त व्हावेत हा ठेवा फक्त नारीला मिळालाय. पुरुष लाजत नाहीत. लाजू शकत नाहीत. ते ओशाळतात, नरमतात, खजिल होतात. आता या स्त्रियांच्या लाजण्यावरही बंदी आणणार वाटतं?
(2) मार्दव- मोरपिशी, हळुवार गोंजारणारं बोलणं हा स्त्रियांचा मक्ता आहे. पुरुषांनी प्रयत्न केला तरी त्यांना जमत नाही. त्यांना गुरगुरायला, अरेरावी करायला, अंगावर ओरडायला सांगा. स्त्रिया गिरणीच्या भोंग्याच्या पट्टीत बोलत असल्या तर त्यांच्या स्त्रीत्वाला बट्टा लागतो.
(3) आर्जव- नाक वर चढवून, आवाजात कातरता आणून गयावया न करता एखाद्या गोष्टीसाठी गळ घालणे हे स्त्र्ायाच करू जाणोत. पुरुषांच्या बापाचं हे काम नाही (आईचं आहे!).

वरील तीन गुणांपैकी एकही अंशतः ही एखाद्या माऊलीकडे (बांदेकर भाऊजींची क्षमा मागून) नसेल तर निदान चारचौघांत तरी तिनं पूर्ण स्त्री असल्याचा फुकाचा व फोल दावा करू नये अशी माझी दोन्ही कर जोडून कळकळीची विनंती आहे.
पुरुष मुरका मारू शकत नाहीत आणि नाही मारू शकत हेच चांगलं आहे. कल्पना करा, ते कसे दिसेल. ‘अय्या’ आणि ‘इश्श’ म्हणायला मुलींना आई शिकवत असेल तर ‘आयला’ म्हणायला मुलांना वडील शिकवत असतील का? आयला!
स्त्री-पुरुष मूलभूत भेद मिटवून टाकायला निघालेल्यांना पाठिंबा म्हणून मी माझा खारीचा वाटा देऊ इच्छितो. माझे प्रकाशक मला म्हणाले की, तुमच्या मागल्या पुस्तकाची आवृत्ती तीन महिन्यांत संपली तर मी आनंदाश्चर्यानं ओरडीन- ‘अय्याsss’

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या