
>> शिरीष कणेकर
मी कबूल करतो की, रमेश गुणेला मोठा माणूस मानायला माझं मन काचकुचतंय. माझा मित्र मोठा झाला आणि मी छोटाच राहिलो हे शल्य तर माझ्या मनात नसेल? छय़ाः मी तर असंच म्हणत आलोय की, जाळताना माझं हृदय सर्वांत शेवटी जाळा, कारण त्याच्यात माझे मित्र राहतात.
रमेश अस्सल कोकणातला भट होता. देवरुखचा. तिथून संगमनेरला आला. तिथून थेट मुंबईला. आमच्या ‘इंडियन एक्सप्रेस’च्या आर्ट डिपार्टमेंटला कसा कुणास ठाऊक लागला. तेव्हाही तो सगळीकडे असा फिरायचा की जणू अख्खा ‘एक्सप्रेस टॉवर्स’ त्याच्या बापाचाच (म्हणजे राधाकृष्ण गुणेचाच) होता. देवरुखला घराच्या अंगणात त्यानं आत्मविश्वासाचं झाड लावलं होतं की काय कोणास ठाऊक! आर्ट डिपार्टमेंटमधून उडी मारून तो आम्हा पत्रकारांत केव्हा मिसळला कळलंच नाही. आल्या आल्या तो कुठल्या तरी इमारतीला लागलेल्या आगीची बातमी टाइप करीत होता. मी सहज त्याच्या खांद्यावरून डोकावलो. त्यान लिहिलं होतं – ‘द बिल्डिंग वॉज सेट ऑन फायर…’ मी त्याला थांबवून म्हणालो, ‘अरे, सेट ऑन फायर म्हणत नाहीत रे. कॉट फायर म्हणायचं. सेट ऑन फायर म्हणजे दुसऱया कोणीतरी आग लावली असा अर्थ निघतो.’
रमेश काहीच बोलला नाही. मात्र त्यानं आपली चूक सुधारली. हा रमेश काही वर्षांनी थेट लॉस एंजेलिसला गेला. हिंदुस्थानात तो एम.ए. होताच, तिकडे त्यानं मानसशास्त्र्ााची पदवी घेतली. ‘बॅटीफोर्ड सेंटर’ या जगप्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्रात तो रोग्यांना ‘सायको थेरपी’ देत होता. फाड फाड इंग्रजी बोलत होता, लिहीत होता. माझ्या मनात आलं की, ‘ही हॅज सेट द अमेरिकन हाऊस ऑन फायर.’ मला तो ‘बेटीफोर्ड सेंटर’ दाखवायला घेऊन गेला. मला बघायला तिथले वेडे गोळा झाले. रमेश आणखी एकाला भरती करायला घेऊन आलाय असाच त्यांचा समज झाला असावा. तिथं मला एक ओळखीचा चेहरा दिसला. बाहेर आल्यावर मला आठवलं… साजिद खान. ‘मदर इंडिया’मधला छोटा बिर्जू. तो नायक म्हणूनही आला होता. तो इथे कसा पोहोचला वो कहानी फिर कभी.
एके दिवशी त्यानं कोणा जैन मुलीशी लग्न केलं. ते बोंबललं. ते बोंबलणारच होतं म्हणा असं आम्ही त्याचे मित्र आपसात कुजबुजलो. जणू आमचं लग्न अजून तरी लौकिकार्थानं बोंबललं नव्हतं यात आमचाच सिंहाचा वाटा होता. मग त्यानं सँडी हॉपल नावाच्या अनाथ तरुणीशी लग्न केलं व तो बायकोमुलासह सुखात गुजराण करतोय. रमेशचा चिंतावजा विचार करण्यापेक्षा आपण आपलं बघावं असं आत्ता कुठं आम्हाला कळायला लागलंय.
तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना खेटून रमेश उभा आहे असा फोटो आपल्याकडच्या मराठी वृत्तपत्रात छापून आला होता. रमेशला ओळखणाऱया आम्ही एकमेकांना विचारलं, ‘रमेश कसा काय बुवा तयार झाला, बुशबरोबर पोझ द्यायला?’
सँडी ‘कायरोप्रॅक्टिशनर’ (म्हणजे बहुधा पायांचा हाडवैद्य) आहे. दुरुस्ती शिकलेली असल्यामुळे ती आरामात रमेशचं तंगडं तोडू शकते. रमेश तिला ‘हाड’तुड करूच शकत नाही. घरच्या पाळीव कुत्रीचं नाव त्यानं सँडीजवळ जाणारं ‘सिंडी’ असं का ठेवलंय हे विचारायचं राहून गेलंय. तो तिला ‘सिंडीबाई।़।़’ अशी आर्त साद घालत असतो.
त्यानं शरीरसंवर्धन व मनःस्वास्थ्यासाठी घराजवळच एक नेत्रदीपक ‘स्पा’ सुरू केलंय. तिथं श्रीमंत व वृद्ध अमेरिकन नारी येतात. तिथल्या वाळूवर उताणं झोपून या म्हाताऱयांना म्हणे ‘डिव्हाइन’ वाटतं.
‘तुला नाही वाटत?’ रमेशनं मला विचारलं.
‘नाही बाबा, त्यात ‘डिव्हाइन’ काय वाटायचं?’ मी तिरसटून म्हणालो.
माझ्यापेक्षा अमेरिकन थेरडय़ा चांगल्या याची रमेशनं मनाशी खुणगाठ बांधली असावी. मला ‘स्पा’चे पैसे मोजावे लागले असते तर ब्रम्हांड आठवलं असतं. पण मराठी माणूस पैसे काढत नाही हे मी काय रम्याला शिकवणार?
रमेश माणसांना गुंडाळून कसा खिशात टाकतो याचं एकच नाममात्र उदाहरण. तो मुंबईत होता तेव्हा तात्यानामे गृहस्थाकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायचा. हा तात्या कमालीचा शिस्तप्रिय होता. सूर्योदयानंतर कोणी झोपून राहिलेलं त्याला खपत नसे. पण ही शिस्त वगैरे सगळं जोवरी न पाहिला रमेश तोपर्यंत होती. रमेश नऊ नऊ वाजेपर्यंत तंडावून झोपायचा. दारावरची बेल वाजली की तात्या चरफडायचा, ‘माणसं झोपलीत इथं… सकाळी-सकाळी कसल्या बेला वाजवताय?’ सकाळी-सकाळी म्हणजे नऊ वाजता व माणसं म्हणजे एकटा रमेश गुणे. डरकाळय़ा फोडणाऱया वाघाचं रमेशनं गरीब कोकरू करून टाकलं होतं. पुढे पुढे तो लाडानं रमेशला ‘साहेब’ म्हणायला लागला होता. आणखी थोडे दिवस रमेश तिथं राहिला असता तर तात्यानं त्याला दत्तक घेतला असता. आम्ही रमेशची टवाळी केलेली तात्याला मुळीच रुचत नसे.
माझा संभाजीनगरला कार्यक्रम होता. रमेशचंही काहीतरी काम होतं. आम्ही एकत्र गेलो. विमानतळावर कॉलेजकन्यकांनी त्याला ओवाळलं. नंतर कोणाला तरी माझी आठवण आली. ते माझ्या स्वागताला आलेत हेही नंतर कोणाच्या तरी लक्षात आलं. तोवर कपाळावर मंगलकुंकू लावून गळय़ात हार घालून रमेश थाटात घोळक्यातून निघाला होता. मी गेलो म्हणा मागून धावत धावत.
आज रमेशचं स्वतःचं मानसोपचार करणारं क्लिनिक आहे. चार संस्थांत तो पाहुणा तज्ञ म्हणून लेक्चर्स देतो. त्यानं मानसशास्त्रात पीएच.डी. केलेय. ही इज अ बिग शॉट नाऊ. तो डॉ. रमेश गुणे आहे. कणेकर आणि अन्य भडभुंजे हो, जबान संभाल के बात करो…




























































