आनंदाचा शिधा गायब, शिवभोजनाला कात्री! लाडक्या बहिणींच्या भाराने सरकार ‘अर्थ’बंधनात

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना एकामागोमाग एक योजना बंद करण्याचा सपाटा महायुती सरकारने लावला आहे. गोरगरीबांना सण-उत्सव आनंदात सुरू करता यावेत यासाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. पण आता सरकारच्या तिजोरात खडखडाट झाल्यामुळे यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित होणार नाही. त्यामुळे गोरगरीबांच्या आनंदावर ‘विरजण’ पडणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022मध्ये आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती. यामध्ये एक किलो चणा डाळ, एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल असा शिधा वितरित करण्यात येत होता. 2023मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीत हा शिधा वाटण्यात आला होता. त्यानंतर 2024मध्ये अयोध्येत राम मंदिरात प्रतिष्ठापना व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आंनदाचा शिधा’ वितरित करण्यात आला होता.

शिवभोजन योजनेला कात्री

कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गोरगरीबांसाठी शिवभोजन योजना सुरू केली होती. कोरोना काळात असंख्य गरजूंना या योजनेचा लाभ झाला होता. ही योजना अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे. शिवभोजन योजना सुरू ठेवण्यासाठी सुमारे 60 कोटी रुपयांची गरज आहे. पण सरकारच्या तिजोरीत सध्या निधीचा खडखडाट आहे. त्यामुळे शिवभोजन योजना सुरू ठेवण्याचे सध्या महायुती सरकारपुढे मोठे आव्हान आहे. ही योजना सुरू ठेवण्यासाठी फक्त वीस कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे  या योजनेत सध्या काटकसर करावी लागणार असल्याचे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.  आर्थिक तरतूद नसल्याने नव्या शिवभोजन केंद्रांना मंजुरी मिळणार नाही तसेच थाळ्यांची संख्याही कमी करण्यात येणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

सध्या लाडक्या बहिणींना निधी वितरित करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत निधी नाही. आता जुलै महिन्याचा निधी ऑगस्टमध्ये रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 8 ऑगस्ट रोजी हा निधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल.

 सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येणार नाही, अशी माहिती खुद्द अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दसरा व दिवाळी व अन्य सणांमध्ये मागील दोन वर्षांपासून आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत होता. पण यंदा आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.