मे महिन्यात आतापर्यंत 30 लाख 58 हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप- छगन भुजबळ

460

राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. दि. 1 मे ते 28 मे पर्यंत राज्यातील 1 कोटी 48 लाख 80 हजार 99 शिधापत्रिका धारकांना 70 लाख 79 हजार 890 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 30 लाख 58 हजार 165 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 20 लाख 26 हजार 697 क्विंटल गहू, 15 लाख 57 हजार 275 क्विंटल तांदूळ, तर 21 हजार 614  क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 4 लाख 22 हजार 452 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 4 मे पासून एकूण 1 कोटी 20 लाख 51 हजार 881 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 5 कोटी 43 लाख 14 हजार 124 लोकसंख्येला 27 लाख 15 हजार 710 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी कार्डधारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि.24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आतापर्यंत 7 लाख 80 हजार 210 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 64 हजार 944 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

राज्यात 1 मे ते 28 मे पर्यंत 834 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 30 लाख 58 हजार 165 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून 2020 या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या