शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसैनिकांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला. आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली होती. शिवसैनिकांच्या या प्रेमाचा आदित्य ठाकरे यांनी विनम्रपणे स्वीकार केला.
आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची पावले ‘मातोश्री’कडे वळतात. हाच उत्साह आजही पाहायला मिळाला. ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच मोठय़ा संख्येने शिवसैनिक दाखल झाले होते. त्यासोबतच सर्वधर्मीय बांधव, महिला, लहानथोरही मोठय़ा संख्येने आले होते. आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी लांबच लांब रांग लागली होती. या सर्वांचेच आदित्य ठाकरे यांनी आदराने स्वागत केले.
– विठुमाऊलीची मूर्ती, प्रभू श्रीरामांची मूर्ती, राम मंदिराची प्रतिकृती, मशाल, फुले पगडी, तलवार अशा भेटवस्तू देत शिवसैनिकांनी आपले प्रेम व्यक्त केले. त्याचा आदित्य ठाकरे यांनी आदरपूर्वक स्वीकार केला.
– ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.
फोटो, सेल्फीसाठी झुंबड
वाढदिवसादिवशी आदित्य ठाकरे यांची होणारी भेट पॅमेऱयात साठवून ठेवण्यासाठी शिवसैनिकांची अक्षरशः झुंबड उडत होती. अनेकजण आदित्य ठाकरेंसोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडत होते. आदित्य ठाकरेदेखील प्रत्येकासोबत सेल्फी घेत शुभेच्छांचा स्वीकार करीत होते.