
सर्व अटींची पूर्तता करूनही मराठी माणसांना सभासदत्व नाकारणाऱ्या दि मुंबई डायमंड मर्चंट, पंचरत्न, गिरगाव असोसिएशनच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी काळे फासले. तसेच सभासद अर्ज भरलेल्या 40 मराठी माणसांना सभासद करून न घेतल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवू, असा इशारा देण्यात आला.
दि मुंबई डायमंड मर्चंट असोसिएशन, पंचरत्न, गिरगाव ऑपेरा हाऊस या असोसिएशनचे मुंबईमध्ये 17 हजार सभासद आहेत. नवीन सभासद अर्ज होण्याकरिता जो अर्ज बनवला होता तोसुद्धा इंग्लिश आणि गुजरातीमध्ये होता. या ठिकाणी 600 जणांनी सभासद होण्यासाठी अर्ज केले होते. त्यामध्ये 40 जण मराठी होते. सभासद होण्याकरिता 60 हजार रुपये भरूनदेखील एकाही मराठी माणसाला सभासद करून घेतले नाही. या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या कार्यालयावर धडक देण्यात आली. या वेळी विधानसभा प्रमुख विकास मयेकर, उपविभाग प्रमुख संपत ठाकूर, राजेश आवळेगावकर, बाजीराव मालुसरे, बाळा अहिरेकर, संतोष घरत, अजय शेंडगे, समन्वयक दिलीप करंदेकर, वैभव वनकर, कुमटेकर, विकास अडुळकर, यश काते, शुभम शिंदे, बाळू मांडवे उपस्थित होते.