‘सुपारीबाज चले जाव!’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या उधळल्या. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलीस, मनसे कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. या वेळी शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना धाराशीव येथे मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर नांदेड येथेही मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. परभणी दौरा आटोपून राज ठाकरे हे आज सायंकाळी बीडमध्ये दाखल झाले. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हॉटेल अन्विता येथे मनसे कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यांच्या गाडय़ांचा ताफा हॉटेलकडे जात असतानाच अचानक शिवसैनिकांचा जथा त्यांना सामोरा गेला. जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकून घोषणा दिल्या.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जालना रोडवर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह अन्य शिवसैनिकांना ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसैनिकांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या वेळी धक्काबुक्कीही झाली. या घटनेनंतर पोलिसांनी हॉटेल अन्विताला छावणीचे रूप दिले. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले.