अमरावतीत शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यावर फेकल्या सोयाबीन, तूर आणि पराटीच्या पेंढ्या; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेना आक्रमक

अमरावती जिल्हा अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला असून शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावती जिह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शिवसैनिक आज आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱयाच्या कक्षात घुसून त्याच्या अंगावर सोयाबीन, तूर आणि पराटीच्या पेंढय़ा फेकून निषेध नोंदवला. ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर एकाही मंत्र्याला अमरावतीत फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

अतिवृष्टीमुळे संपूर्ण अमरावती जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्रात शेतकऱयांच्या शेतात पाण्याचे लोट वाहून हाहाकार माजला आहे. सोयाबीन, तूर, कापूस व अन्य पिके अतिवृष्टीमुळे शेतातच सडून गेली आहेत. त्यातच शासनाने एक रुपयात पीक विमा ही योजना बंद केल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन अडचणीत आला आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

सरसकट पंचनामे करून नुकसान झालेल्या सर्व पिकांची पाहणी जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार व अन्य अधिकाऱयांनी बांधावर जाऊन करावी आणि अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी गुडधे यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे, मनोज कडू, उपशहरप्रमुख विजय ठाकरे, तालुकाप्रमुख प्रमोद धनोरकार, कपिल देशमुख, नितीन हटवार, शिवराज चौधरी, सचिन ठाकरे, वैभव मोहोकार, राजेश बंड, रामा सोळंके, विजय जामोदकर, विजय पाचगरे,  दिलीप काळे, प्रदीप गौरखेडे, सतीश हरणे, मनोज साबळे, विजय तायडे, संजय पिंगळे, पैलास अवघड, प्रवीण रोडे आदी शिवसैनिक आणि शेतकऱयांनी या आंदोलनात भाग घेतला.