
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा सुरू आहे. पुढील एक-दोन दिवसांत शिवसेना-भाजप महायुतीवर शिक्कामोर्तब होईल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. युतीच्या चर्चेत केवळ जागावाटपाची चर्चा होत नसते तर इतरही अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होत असते. महायुती झाल्यावरही इतर मुद्दय़ांवरील चर्चा सुरूच राहील पण तरीही युती नक्की कधी होणार, अनंत चतुर्दशीनंतर होणार का असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर युतीची घोषणा कधीही होऊ शकते, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याची योजना आहे त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना सत्तेत असो अथवा नसो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दल कोणी वेडेवाकडे करील याची सुतरामही शक्यता नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यापेक्षा ओवेसींशी बोलावे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा शिवसेनेने रेटून धरला पाहिजे असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे त्याबाबत पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी शिवसेनेवर बोलण्याऐवजी ओवेसींशी बोलावे.
बांगलादेशींची हकालपट्टी करा!
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर आसाममधून घुसखोर बांगलादेशी नागरिकांना देशाबाहेर काढले जाईल. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढले पाहिजे ही भूमिका हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढा असे शिवसेनाप्रमुख वारंवार सांगत. आजही आमची भूमिका स्पष्ट आहे. बांगलादेशी नागरिकांना केवळ मुंबईतूनच नव्हे तर देशाच्या बाहेर काढले पाहिजे आणि ज्यांना बांगलादेशी पाहिजे असतील त्यांनी बांगलादेशी नागरिकांना मांडीवर घेऊन बसावे असा टोला लगावला.




























































