
सामना प्रतिनिधी । भोकर
नांदेडमधील भोकर बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या येण्याआधीच नारळ वाढवून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं. शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम पत्रिकेत जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याने काँग्रेसच्या या मनमानीला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस गटाचे वर्चस्व आहे. संचालक मंडळात शिवसेना-भाजपचे संचालक असताना तसेच भूमिपूजनाचा कार्यक्रम शासकीय असताना कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत केवळ काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीच नावं टाकली होती. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेत बदल करून शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांची नावं समाविष्ट करावी अन्यथा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शहरात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. भूमिपूजनाचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र याला चकवा देत शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजित वेळे आधीच जावून माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण भूमिपूजनासाठी येण्या अगोदरच नारळ वाढवत पुजाअर्चा करून कार्यक्रम पार पाडला. त्यामुळे शिव सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस वर केलेल्या कुरघोडीमूळे काँग्रेसच्या मनमानीला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.
यावेळी पोलीसांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश देशमुख, सुभाष नाईक, प्रदिप दौलतदार,रमेश पुरी,माधव वडगावकर यांच्यासह अनेकांना कार्यक्रम संपेपर्यंत ताब्यात घेतले होते.




























































