शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची ‘झेप्टो’च्या गोडाऊनवर धडक, अन्न औषध प्रशासनाने घेतली झाडाझडती

शिवडी येथील झेप्टो फूड डिलिव्हरी यांच्या गोडाऊनवर शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने धडक देत अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीला आणल्या. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गोडाऊनची झाडाझडती घेतली. यावेळी काही खाद्यपदार्थांची एक्सपायरी डेट निघून गेलेली तसेच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ एकत्रितरित्या साठवून ठेवलेले आढळले. खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणारे तेलदेखील एक्सपायरी झालेले निदर्शनाला आले. अन्न औषध प्रशासनाने अनेक नमुने तपासणीसाठी घेतले असून कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे.

देशात सध्या ऑनलाईनद्वारे खाद्यपदार्थ आणि इतर घरगुती वस्तू मागवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूकदेखील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या संख्या तक्रारी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या निदर्शनाला आल्या. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या आदेशानुसार, कक्षाचे सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवडी येथील झेप्टो फूड डिलिव्हरी यांच्या शिवडी येथील गोडाऊनवर धडक दिली. यावेळी खाद्यपदार्थ तसेच इतर अनेक वस्तूंबाबत अनेक धक्कादायक गोष्टी आढळल्या. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षामुळे या गोष्टी उघड झाल्या. यावेळी कक्षाचे खजिनदार देविदास माडये, कार्यकारणी सदस्य बबन सकपाळ, कक्ष विधानसभा संघटक प्रथमेश जगताप, कृष्णकांत शिंदे यांच्यासह वरळी-शिवडीतील कक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.