प्रभादेवीतील पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करा! शिवसेनेची आग्रही मागणी

वरळी-शिवडी उन्नत रस्त्याच्या कामासाठी सवाशे वर्षे जुन्या एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू करण्यात आले. त्याआधी प्रशासनाने पादचाऱयांच्या गैरसोयीचा प्रश्न विचारात घेतलेला नाही. रहिवासी, शाळकरी मुले, रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदींची गैरसोय दूर करण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकातील दक्षिणेकडील पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

परळ परिसरात अनेक प्रमुख रुग्णालये असून तेथे मुंबई, ठाणे, पालघरसह राज्याच्या उर्वरित भागांतून रुग्ण येतात. तसेच येथील शाळा-कॉलेजमध्ये बाहेरून येणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यासह परळ, प्रभादेवीतील स्थानिक जनता आणि नोकरदारांना रेल्वे मार्गिकेवरून पूर्व-पश्चिम अशी ये-जा करण्यासाठी प्रभादेवीच्या पादचारी पुलाचे काम वेळीच पूर्ण करण्याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. गेली दहा वर्षे लोकसभेपासून रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱयांपर्यंत जोरदार मागणी लावून धरली. अखेर वर्षभरापूर्वी पुलाला मंजुरी मिळाली, पण कामाला गती येत नव्हती. शेवटी सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या आग्रही मागणीनंतर पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले, मात्र ते पूर्ण होण्याआधीच एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, रुग्ण, शाळकरी मुले आदींची प्रचंड गैरसोय होणार आहे. संभाव्य गैरसोय दूर करण्यासाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सावंत यांनी केली आहे. तसेच वृद्ध नागरिक, रुग्ण आणि दिव्यांग लोकांना पुलावर जाण्यासाठी एस्केलेटर किंवा लिफ्टची व्यवस्था करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

एमएमआरडीएमुळे शिवडी पुलाचे काम रेंगाळले

शिवडी रेल्वे स्थानकावरून जाणाऱया पूर्वपश्चिम जोड पादचारी पुलाचे काम एमएमआरडीएच्या उदासीनतेमुळे रेंगाळले आहे. शिवडी बस डेपोपासून शिवडी रेल्वे स्थानकापर्यंत पूल बांधण्याची आणि तो पूल स्टेशनच्या दक्षिण टोकाच्या पूर्वेकडे वाढवण्याची मागणी अरविंद सावंत यांनी वेळोवेळी केली, मात्र एमएमआरडीएने पुलाच्या कामाला गती देण्याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुलाचे काम रखडले आहे. परिसरातील रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.