
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सहा महिने तरी त्यावरून अवजड वाहने सोडू नयेत, केवळ प्रवासी वाहनांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली आहे. त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
मिसिंग लिंक प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होऊन वाहतुकीस खुला होणार असल्याचे समजते. तो पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होऊन अपघातात घट होणार आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका होणार आहे. मात्र बोर घाटातील खोल दरीत मोठय़ा प्रमाणात हवेचा दाब आहे. तसेच पाऊस व धुक्याचे गडद क्षेत्र असल्याने सदर प्रकल्पातील सर्व तांत्रिक चाचण्या व कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू करण्याची घाई करू नये, असे नार्वेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
अवजड वाहनांमुळे घाटात मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत असते. अशा स्थितीत दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची इंधने अथवा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारी वाहने या मार्गावर सोडण्यात येऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.



























































