
पुणे, कोल्हापूरसह राज्याच्या विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढत असताना आता नॅशनल पार्कलगत असणाऱ्या मालाड पूर्व येथील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे समोर आले आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिवसा आणि रात्री फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बिबट्याचे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
गोरेगाव पूर्व दिंडोशी विधानसभा क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या रो हाऊस व शेजारी न्यू म्हाडा कॉलनी असून या परिसरात सुमारे पाच हजार रहिवासी वास्तव्य करीत आहेत. या परिसरात ऑक्टोबरपासून रात्री-अपरात्री बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्यांच्या धोक्याबाबत संबंधित सोसायटी आणि संजय गांधी परिसरात संभाव्य बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे.
संरक्षक जाळी ओलांडून बिबटे सोसायटीत
संबंधित सोसायटीच्या आवारात म्हाडाच्या परवानगीने 26 मे रोजी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या. मात्र बिबटे संरक्षक जाळ्या ओलांडून थेट सोसायटीत येत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. शिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची 6 फूट उंचीची भिंत ओलांडून बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत. या ठिकाणी इतर प्राणीदेखील असल्याने कोणत्याही वेळी हल्ला होण्याचा धोका आहे. त्यामुळे या ठिकाणी दिवसा आणि रात्री फिरणेही कठीण बनले असल्याचे वनमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.





























































