
आयकर विभागातील नोकरभरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे यासाठी स्टाफ सिलेक्शनऐवजी प्रादेशिक स्तरावर भरती करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त मालती श्रीधरन, आयुक्त मुख्यालय अंकुश कपूर, अतिरिक्त आयुक्त मारुती मुद्देवार, उप आयकर आयुक्त नीरज अग्रवाल यांची भेट घेतली. आयकर विभागातील कॅण्टीन कर्मचाऱ्यांची पदोन्नती, नोकरभरतीतील गैरप्रकार, भूमिपुत्रांना नोकरभरतीत प्राधान्य मिळावे आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
यावेळी आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष विकास मोरे, मुकुंद परब, सरचिटणीस स्वाती नाईक, शिल्पा दळवी, सतीश घाणेकर, किरण कुबल, प्रमोद वाघे, परमानंद ठाकूर आणि भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव आदी उपस्थित होते.