दादरच्या इंदू मिलमध्ये होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक रखडले असतानाच त्यांच्या दिल्लीत बनवल्या जात असलेल्या भव्य पुतळ्यात काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. सरकारने महामानवाच्या स्मारकाकडे गांभीर्याने पाहावे आणि असलेल्या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामाजिक न्याय विभागाकडे केली आहे.
शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयाखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आज भेट घेऊन पुतळय़ातील त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन दिले. स्मारकाची रखडपट्टी थांबवून लवकरात लवकर स्मारक पूर्ण करावे, या मागणीसाठी एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेतली होती. या शिष्टमंडळाला मुखर्जी यांनी बाबासाहेबांचा दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या पुतळय़ाचे काही पह्टो दाखवले. या पह्टोत पुतळय़ाची उंची, वेशभूषा तसेच इतर अनेक त्रुटी आढळल्या. याबाबत आज शिवसेना पक्ष संघटक विलास रूपवते यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी विजय वाघमारे यांच्या या त्रुटी लक्षात आणून दिल्या. त्रुटी आढळल्या तर त्याचे लवकरात लवकर निवारण केले जाईल, असे आश्वासन वाघमारे यांनी दिले. यावेळी कामगार नेते रमेश जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अक्षय आंबेडकर, प्रतीक कांबळे, राजेश खाडे, रवी गरुड, मिलिंद सुर्वे, भीम आर्मी मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड, सागर संसारे, सुदर्शन सपकाळ, बाळासाहेब पवार त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील प्रतिनिधीही उपस्थित होते.