अंधेरी गावदेवी मंदिर परिसराला नवा साज, शिवसेनेच्या प्रयत्नातून झाले सुशोभीकरण

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे अंधेरीतील श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट परिसराचे सुशोभीकरण आणि मंदिर कार्यालय दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. नुकताच या कामाचा भव्य लोकार्पण सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी मंदिर ट्रस्टने शिवसेनेचे आभार मानले.

श्री गावदेवी दुर्गा देवस्थान ट्रस्ट परिसराचे सुशोभीकरण शिवसेना नेते, विभागप्रमुख – आमदार अॅड. अनिल परब यांच्या आमदार निधीतून करण्यात आले आहे. अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम आणि उपविभागप्रमुख प्रसाद अहिरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. ‘हे देवस्थान हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर अंधेरीच्या सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. भविष्यात हे मुंबईतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि आकर्षक स्थळ बनेल,’ असे शिवसेना नेते अनंत गीते यावेळी म्हणाले. तर ‘आपण सर्व मिळून या संपूर्ण परिसराचा आणखी विकास करू. गावदेवी मंदिर आणखी भव्यदिव्य आणि आकर्षक करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे,’ अशी हमी अॅड. अनिल परब यांनी दिली.या सोहळय़ाला शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभाग संघटक अनिता बागवे, समन्वयक सुनील जैन खाबिया यांच्यासह शिवसैनिक, स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.