
शहरातील स्वच्छतेचा अभाव, बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, रस्त्यांची दुरवस्था आणि विविध विकासकामांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला कोळसेवाडीतील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
कल्याण पूर्व येथील मराठा कोळसेवाडी परिसरात जुन्या जनता बँकेजवळ उपशहरप्रमुख शांताराम गुंडे यांच्यासह शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपोषणाला बसले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासकामातील भ्रष्ट कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. केडीएमसी कारभाराविरोधात शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे शिवसैनिकांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाप्रमुख शरद पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नारायण पाटील, महिला शहर संघटक मीना माळवे, युवासेना शहर अधिकारी अॅड. नीरज कुमार यांनी आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.
बिल्डर्सच्या फायद्यासाठी रस्ता वळवला
जरीमरी, कोळसेवाडी येथील म्हसोबा चौक ते भैरव टी असा १०० मीटर रस्ता मंजूर असताना बिल्डर्सच्या फायद्यासाठी जॉली टेलर ते नवीन जनता बँक असा रस्ता करण्यात आला. पालिकेची वर्क ऑर्डर तसेच आयुक्तांची परवानगी न घेता प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदाराने चुकीचे काम केले. बनवलेला रस्ता निकृष्ट आणि अयोग्य बनवला आहे. कुठे १५ फूट तर कुठे २० ते ३० फूट रस्त्याची रुंदी आहे. तसेच रस्ता बनवताना मोठी झाडे विनापरवाना तोडल्याचा आरोप उपशहरप्रमुख शांताराम गुंडे यांनी केला.



























































