धुळे महापालिका निवडणूक- खासदार संजय राऊत करणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते, खासदार संजय राऊत यांची उद्या 6 डिसेंबर रोजी धुळय़ात जाहीर प्रचारसभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी साडेसहाला शहरातील गल्ली क्रमांक 6 मध्ये सुभाष पुतळय़ाजवळ सभा होणार आहे. त्यामुळे धुळेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. धुळे महानगरपालिकेत शिवसेना पक्षाने 48 जागांवर अधिकृत उमेदवार दिले असून दोन शिवसेनापुरस्कृत उमेदवार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना स्वतःहून पाठिंबा जाहीर केल्याने धुळे महानगरात निवडणुकीत अधिक रंगत आली आहे. यापार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचे धुळ्यात आगमन होत असून त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागले आहे. 6 डिसेंबरला सायंकाळी साडेसहाला सुभाष पुतळ्याजवळ होणाऱ्या सभेत खासदार संजय राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन होईल. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा संपर्कप्रमुख के. पी. नाईक, माजी सहसंपर्क प्रमुख विजय रावराणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा व महानगर पदाधिकारी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करतील.

सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना धुळे महानगर शाखेने केले आहे. यानंतर 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता खासदार संजय राऊत धुळे शहरातील हॉटेल स्पाईस स्ट्रीट, फुलवाला खुंट, ग. नं.4 धुळे येथील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना धुळे महानगर शाखेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.