फॉर्म्युला ठरलाच नव्हता मग चर्चा कशासाठी? शिवसेना ऑन रेकॉर्ड

3071
shivsena-logo-new

समान सत्तावाटपाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी फिरवताच शिवसेनेने आज भाजपसोबत होणारी सरकारस्थापनेची बैठकच रद्द केली. फॉर्म्युला ठरला नव्हता मग चर्चा कशासाठी, असा रोकडा सवाल करत शिवसेनेने बैठक रद्द झाल्याचा निरोप भाजपला धाडला.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘ऑन द रेकॉर्ड’ काय बोलले होते याची चित्रफीतच दाखवली. त्या पत्रकार परिषदेला भाजपाध्यक्ष अमित शहासुद्धा उपस्थित होते. तेव्हा सरकारमधील पदे आणि जबाबदाऱयांचे समसमान वाटप होईल असे ऑन द रेकॉर्ड सांगणाऱया मुख्यमंत्र्यांनी आज मात्र ‘ऑफ द रेकॉर्ड’ पलटी मारली. शिवसेनेने आज पुराव्यासह पोलखोल केले.

18 फेब्रुवारी 2019 रोजी मुख्यमंत्री काय म्हणाले…
पुन्हा सरकारमध्ये आल्यावर पदे व जबाबदाऱया यांची समानता राखण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्यादृष्टीने जे पद व जबाबदाऱया सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीने सांभाळण्यात येतील हाही निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे.

सत्य आणि न्याय्य
यावर अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर कधीही चर्चा झाली नाही असे मुख्यमंत्री बोलत असतील तर आपल्याला सत्याची व्याख्याच बदलावी लागेल. कारण मुख्यमंत्री ज्याबाबत बोलत आहेत त्यावर भाजप व शिवसेनेत काय चर्चा झाली हे सर्वांनाच माहिती आहे. माध्यमांचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री स्वतŠ फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर बोलले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हे वारंवार सांगितले आहे. अमित शहांच्या समोर हे बोलणे झालेले आहे. जर आता ते म्हणत असतील की, अशी चर्चाच झालेली नाही तर मी अशा विधानाला प्रणाम करतो. कॅमेऱयासमोर ते काय म्हणाले हेच ते नाकारत आहेत असे संजय राऊत म्हणाले. जे सत्य आणि न्याय्य आहे तेच आम्ही म्हणतोय, आम्ही मागतोय असेही राऊत म्हणाले.

सॉफिटेलची बैठक रद्द
शिवसेना-भाजपमधील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बीकेसीमधील ‘सॉफिटेल’ या हॉटेलमध्ये महायुतीची आज बैठक होणार होती. या बैठकीला भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव तर शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते सुभाष देसाई व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार होते; पण मुख्यमंत्र्यांनी फॉर्म्युलाच ठरला नव्हता असे सांगताच शिवसेनेने ही बैठकच रद्द केली.

पवारांचे कौतुक मोदींनीही केले
‘सामना’त टीका होत असल्याने भाजप नाराज आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याबाबत पत्रकारांनी विचारले असता खासदार राऊत म्हणाले, ‘सामना’मध्ये आलेली एक ओळ दाखवावी जी भाजपच्या विरोधात असेल. ‘सामना’ हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आहे. ‘सामना’ स्वभाव बदलणार नाही. शरद पवार यांचे कौतुक सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदींनी शरद पवार यांचे कौतुक केले म्हणून राज्यातले नेते मोदींवर बहिष्कार टाकणार का? पवार यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणी दिला, असा प्रश्नही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या