
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून भाजप, त्यांचे मित्र पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आपले परखड मत व्यक्त केले. मंत्रिमंडळातील त्या बाबाच्या कडवड भक्तांनाही या प्रकरणी सहआरोपी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली.
मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदू बाबाचे कडवट भक्त आहेत. तसेच आजी-माजी मंत्री, अनेक नेतेही त्याचे भक्त आहेत. मात्र, असे असूनही एकाचेही नाव उघड झालेले नाही, यालाच राजकारण असे म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, या प्रकरणात राजकारण करू नका, या प्रकरणात कोण राजकारण करत आहे? यात कोणीही राजकारण करत नाही. राजकारण काय आहे, हे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा त्यांनी घेतला. त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, मात्र, मंत्रिमंडळात त्या भोंदू बाबाला पाठबळ देणारी लोकं आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांच्यापर्यंत धागेदोरे पोहचू नयेत, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्याची आपली मागणी आहे.
आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात शाहू, फुले आंबेडकर, संत गाडगेबाब, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचे आहोत. मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची भूमिका अशा बुवाबाजीला उत्तेजन देणारी आहे. गेल्या काही काळात सत्तास्थापनेसाठी, मतं मिळवण्यासाठी अनेक बुवा आणि बाबा त्यांनी राजकारणात आणले. वारकरी संप्रदायालाही त्यांनी राजकारणात ओढले. त्यामुळे अशा बुवा,बाबांचे त्यांना वावडे नाही. कदाचित खरात बाबाचे अनेक अनुयायी असल्याने त्याला भाजपमध्ये शुद्ध करून घेतले जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
या प्रकरणात असलेल्या नेत्यांचीही चौकशी होण्याची गरज आहे. त्याचे असे आत्मबळ का घसरले, मंत्री असतानाही आत्मविश्वास का डगमगला, असे काय घडले की त्यांना या बुवाबाजीचा आधार घ्यावा लागला. त्या बाबाच्या एका ठिकाणी पाणी देण्यात आले, ते कोणत्या साली दिले, कोणत्या कॅबिनेटने दिले, त्या उपसमितीवर कोण होते, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी या संवेदनशील विषयावर जबाबदारीने भूमिका घेणे गरजेचे आहे. कोणाला तरी वाचवायचे त्यामुळे थोतांडी विधाने करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, त्यांना खरातच्या सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. त्यांच्या मित्रपक्षातील आमदार, खासदार तेथे जात त्या बाबाला बळ देत होते. त्याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यांच्याबाबत फडणवीसांची काय भूमिका आहे, ते त्यांनी स्पष्ट करावे. या मंत्र्यांना समज देण्यासाठी त्यांनी शिबीर भरवावे, या प्रकरणी फडणवीस स्वतःच राजकारण करत असून त्यांनी ते करू नये, असेही संजय राऊत म्हणाले.
राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे, त्याचा वापर की करणार? की सर्वसामान्य,आदिवासी यांच्यावरच कारवाई करणार का? मंत्रिमंडळातील त्या मंत्र्यांचे कान उपटण्याचे काम तरी मुख्यमंत्र्यांनी करावे. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला मतांसाठी बुवाबाजीचा नाद आहे, हेच यातून दिसून येते. तेच त्यांचे हिंदुत्व आहे. त्यामुळे आम्हाला चिंता वाटते, असे ते म्हणाले.























































