लोककलेचा आवाज घुमला, मराठी मातीचा सोहळा रंगला; ‘द फोक आख्याना’ने रसिकांची मने जिंकली

पाश्चात्य कला हातपाय पसरू लागल्याने महाराष्ट्राची लोककला लोप पावत चालली आहे. अशा वेळी लोककलांना संजीवनी देण्यासाठी, त्यांना मानसन्मान, गतवैभव परत मिळवून देण्यासाठी युवा कलावंतांनी आख्यानाचा अध्याय रचला. त्याची आवतानं नव्या-जुन्या पिधाडली आणि त्याला मान देत रसिकांची पावलं कलामंचाकडे वळू लागली. याची प्रचिती बुधवारी रवींद्र नाटय़मंदिरात आली. प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत ‘द फोक आख्यान’चा सांगीतिक थाट रंगला. लोककलेचा आवाज घुमला, मराठी मातीचा सोहळा रंगला. त्यामध्ये प्रेक्षक हसले, रडले आणि नाचलेही! एक वेगळा अनुभव घेऊन बाहेर पडले.

उद्धव ठाकरे यांनी केली प्रशंसा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘फोक आख्यान’ कार्यक्रमाची प्रशंसा केली. रंगमंचावर जाऊन त्यांनी यातील कलाकारांची भेट घेतली आणि त्यांची संकल्पना आणि कलेला दाद दिली. महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककलेबद्दल लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तुम्ही करत आहात. ही कला सर्वदूर पसरवा. त्यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कलाकारांच्या टीमने यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत छायाचित्रही काढले. त्यामध्ये निर्माता रणजित गुगळे, कार्यक्रमाची मूळ संकल्पना आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणारे हर्ष राऊत व विजय कापसे, लेखक-गीतकार-निवेदक ईश्वर अंधारे, क्युरेटर निर्माता भूषण मेहरे, गायक ऋषिकेश रिकामे, चंद्रकांत माने, अनुजा देवरे, रुचा कुलकर्णी आणि वाद्यवृंदातील कलाकारांचा समावेश आहे.

संस्कृती-परंपरा उलगडली

लमाणबंधूने रसिकांना आख्यानाची सैर घडवली. आख्यानाची कथा नऊ दिवसांच्या नऊ माळामंध्ये सादर झाल्या. ही कथा भूतकाळ ते वर्तमान आणि भविष्याशी जोडली होती. सुंबरन गायक, छत्रपतींची घाटोळी आणि गाणारे शाहीर, मराठमोळी वाद्यं, लोककलावंत, राज्याच्या कानाकोपऱयातील बोली यांची माहिती अनोख्या थाटाने सादर झाली. जात्यातील ओव्यांनी, मायलेकीच्या बंधांनी उपस्थितांच्या डोळय़ाच्या कडा पाणवल्या. ‘द फोक आख्यान’ला रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला.

तरुण कलाकारांची चळवळ

महाराष्ट्रामध्ये बारा कोसावर जशी बोलीभाषा बदलते त्याच पद्धतीने लोककलेची बाज, परंपरा, सादरीकरणाची पद्धत बदलते. ‘द फोक आख्यान’ म्हणजे मराठी संस्कार, परंपरा, संस्कृती यांना चिरंजीवी ठेवण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या कलाकारांची चळवळ आहे. पाश्चात्त्य कला वेगाने हात-पाय पसरू लागल्याने लोककला पूर्णपणे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. असं होऊ नये म्हणून मराठी आख्यानकथा कलेचा मार्ग निवडून, गणापासून गोंधळापर्यंत नवीन रचना आणि चाली बांधून, मराठी लोककलेला तोच मान, सन्मान, लोकाश्रय मिळवून देण्यासाठी, तिच्या अस्सल मराठी संस्कारांची भुरळ पाडण्यासाठी, लोककलेचे सेवेकरी होऊन तरुण कलाकारांची ही चळवळ उभी राहिली आहे. या आख्यानात मराठी संस्कृती-परंपरा जपण्याचे काम होत असून यानिमित्ताने सामाजिक संदेशही दिला जात आहे.