भाजपची भोगी मानसिकता, रोगी शासनव्यवस्था; उत्तर प्रदेश सरकारविरोधात कांजूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित मुलीवर समाजकंटकांनी बलात्कार करून तिच्या देहाची विटंबना केली. ‘भाजप’ची भोगी मानसिकता, रोगी शासनव्यवस्था असल्यामुळेच असा प्रकार घडल्याची टीका करीत कांजूरमध्ये आज शिवसेनेने तीव्र आंदोलन करीत भाजप सरकारचा निषेध केला.

हाथरसच्या घटनेतील मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि भाजपच्या योगी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी विक्रोळी मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशात ‘योगी’ सरकार नसून ‘भोगी’ सरकार आहे अशी टीका आमदार सुनील राऊत यांनी केली. युपीतील भाजप सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. महाराष्ट्रात लहानशी घटना घडली तरी राज्याची बदनामी करायला धावणारे आता काही का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. यावेळी विभाग संघटिका संध्या वडावकर, उपविभाग संघटिका रश्मी पहूडकर, स्नेहल मांडे, विधानसभा संघटक संदीप सावंत, मामा मंचेकर आदी उपस्थित होते.