
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, तसेच श्रीमलंगगड परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण केलेल्या एक लाख झाडांना लावलेल्या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आज विधान भवनाच्या पायऱयांजवळ जोरदार आंदोलन केले. शिवसेना आमदारांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे विधान भवनाचा परिसर दणाणून गेला.
ठाणे जिह्यातील श्रीमलंगगड परिसरात शिवसेनेने लोकसहभागातून लावलेल्या एक लाख झाडांना आगी लावण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, बालाजी किणीकर, नरेंद्र दराडे, सुभाष भोईर यांनी विधान भवनाच्या पायऱयांवर ठिय्या दिला होता. ‘शिवसेनेने मलंगगड परिसरात लोकसहभागातून वृक्षारोपण केलेल्या एक लाख झाडांना लावलेल्या आगीची चौकशी करावी’, ‘झाडांना लावलेल्या आगीचे लाभार्थी कोण, भूमाफिया, वनविभाग दुसरे कोण!’अशी पोस्टर्स घेऊन शिवसेना आमदारांनी पायऱयांवरच ठाण मांडले होते. ‘आगीला जबाबदार असणाऱया बेजबाबदार वन अधिकाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे’, ‘एक लाख झाडे लावणाऱया हजारो हातांची मेहनत वाया घालवणाऱया बेजबाबदार वन अधिकाऱयांनो चालते व्हा’ अशा जोरदार घोषणा दिल्या. वृक्षलागवड महाअभियानाअंतर्गत राज्यभरात लावलेल्या कोटय़वधी झाडांचे ऑडिट करण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
आरक्षणासाठीही आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठीही विधान भवन परिसरात शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. पुढच्या काळात शांतता हवी असेल तर मराठा समाजाला तातडीने न्यायालयात टिकेल असे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्या अशी मागणी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. आमदार सुजीत मिनचेकर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील, प्रकाश आबिटकर यांनी या मागणीसाठी घोषणा देत आंदोलनात सहभाग घेतला. मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले पण आरक्षण मिळाले नाही. न्यायालयाचे आणि मागासवर्ग आयोगाचे कारण देत मराठा समाजाचा फुटबॉल करत आहेत. पुढच्या काळात मराठा समाज शांत ठेवायचा असेल तर कायद्याने आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
























































