पोलिसांच्या सन्मानासाठी शिवसेना रस्त्यावर, भाजपच्या गुंडांकडून झालेल्या पोलीस हल्ल्याचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या गुंडांकडून पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या गुंडांचीच बाजू घेत खैरमोडे यांना आरोप मागे घेण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांच्याकडून दबाव आणण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी   शिवसेना नेते युवासेनाप्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. ‘चलो आओ मैदान मैं मुंबई पोलीस के सम्मान मे’ असा नारा देत भाजपच्या गुंडगिरीचा तसेच आमदार राम कदम यांचा निषेध करीत त्यांचे पोस्टर फाडण्यात आले.

शिवसेना-युवासेनेच्या वतीने आज मुंबईत विविध ठिकाणी दुपारी 2.30 वाजता निदर्शने करून पोलीसांवर हल्ला करणारे भाजपचे गुंड आणि आमदार राम कदम यांचा निषेध करण्यात आला. ’महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला’ जर भाजप सारखा गुंड प्रवृत्तीचा पक्ष खतपाणी घालत असेल तर हे कदापि सहन करणार नाही, असा इशाराच यावेळी देण्यात आला. वरळी नाका, दादर येथे शिवसेना भवन, वांद्रे पूर्वेकडे चेतना कॉलेज जवळ, अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक, गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक, कांदिवली स्टेशनजवळ शिवसेना शाखा क्र. 24च्या वतीने तर घाटकोपर येथे रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजजवळ निदर्शने करण्यात आली, अशी माहिती युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी दिली.

शिवसेना भवन येथे नगरसेवक समाधान सरवणकर, अमेय घोले यांच्यासह युवासेना कार्यकर्ते तसेच शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. वरळी नाका येथे शिवसेना उपनेते सचिन अहिर, नगरसेवक आशीष चेंबुरकर, अरिंवद भोसले, स्नेहल आंबेकर यांच्यासह  शिवसैनिक मोठया संख्येने या सहभागी झाले. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील झुनझुनवाला कॉलेजजवळ करण्यात जोरदार निर्शनावेळी विभागप्रमुख राजेंद्र राऊत, विभाग संघटिका डॉ. भारती बावदाने यांच्यासह शिवसैनिकांनी जोरदार भाजपच्या गुंडगिरीविरोधात घोषणा दिल्या.