
मुंबई महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या सहा प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुकीत एच/पूर्व, एच/पश्चिम प्रभागमधून शिवसेनेच्या रोहिणी कांबळे तर जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पद्मजा चेंबूरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 6 प्रभाग समिती जी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी मनसेकडून नगरसेवक यशवंत किल्लेदार बिनविरोध निवडून आले.
एच/पूर्व व एच/पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी जाहीर केले. एच/पश्चिम विभाग कार्यालयात पार पडलेल्या या निवडणूकप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ-3) विश्वास मोटे, सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे, महापालिका उप सचिव प्रियांका देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
‘पी/दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नगरसेविका श्रीकला पिल्ले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा पीठासीन अधिकारी महापौर रितू तावडे यांनी केली. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ–4) डॉ. भाग्यश्री कापसे, पी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते. 6 प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले.
एकूण निकालानुसार, 17 पैकी 12 प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपकडे 6, शिवसेनेकडे 2, काँग्रेस पक्षाकडे 2 तर मनसेकडे -1 आणि शिंदे गट – 1 प्रभाग समिती अध्यक्षपदे आली आहेत. दरम्यान, पाच प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका 9 मार्च रोजी होणार आहेत.





























































