
कबुतरखान्यांवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. असे असतानादेखील मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या निधीतून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखाना उभारण्याच्या घाट घातला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक तसेच राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी यांनीही या कबुतरखान्याला विरोध दर्शविला.
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील तीन मूर्ती येथील जैन मंदिराच्या आवारात आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या निधीतून नव्या कबुतरखान्याचे उद्घाटन करण्याचा घाट घातला गेला. याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर व माजी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आज या कबुतरखान्याला धडक देऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विभाग संघटक शुभदा शिंदे, विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, रेखा बोराडे, विधानसभा समन्वयक राजू मुल्ला, सिनेट सदस्य मिलिंद साटम, शशिकांत झोरे, उपविभागप्रमुख विनायक सामंत, अभिलाष कोंडविलकर, सचिन मोरे, हनुमंत मोरे, वनिता दळवी, इतिश्री महाडिक, वर्षा चोपडे, रोहिणी सावंत आदी उपस्थित होते.
महापालिकेचे दुटप्पी धोरण
n कबुतरांचे अस्तित्व वाढल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. मुंबई महापालिका एका बाजूला कबुतरखाने बंद करत आहे, तर दुसरीकडे आर मध्य विभागाने या कबुतरखान्याला परवानगी दिल्याचे समजते, याबाबतही पालिका आयुक्तांनी आपले धोरण स्पष्ट करावे, असे आवाहन घोसाळकर यांनी केले.
n हा भूखंड खासगी असला तरीही उद्यानाच्या इको झोनमध्ये येत असून या परिसरात सध्या एकही कबूतर नाही. येथे जवळच फरलेवाडी, तीन मूर्ती, देवीपाडा अशी मोठी लोकवस्ती आहे. भविष्यात कबुतरांची संख्या वाढल्यास येथील नागरिकांना त्रास होऊ शकतो, याकडे विनोद घोसाळकर यांनी लक्ष वेधले.