नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशनच्या 18 कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

36 वर्षांपासून कार्यरत असलेल्या नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटरमधील 18 कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या आणि 5 निवृत्त कर्मचाऱयांची देय थकीत रक्कम द्या, अशी मागणी शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

परळ येथील केईम रुग्णालयात नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटर या संस्थेच्या अधिपत्याखाली गेल्या 36 वर्षांपासून 30 कर्मचारी कार्यरत आहेत. या सेंटरमार्फत औषधे तयार करून पालिकेच्या रुग्णालयात वितरीत केली जातात. त्यातून मिळणाऱया उत्पन्नातून कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्ती वेतनांचा खर्च भागविले जाते.

30 पैकी 12 कर्मचारी सेवेतून निवृत्त झाले आहेत. संस्थेने केलेल्या औषध विक्रीतून 6 कोटी 24 लाख रुपये निधी पालिकेकडून येणे थकीत असतानाही अद्याप पालिकेने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. संस्थेवरील महापालिकेचे उच्च पदाधिकारी यांनी कर्मचाऱयांचे निवृत्ती वेतन आणि सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱयांचे पगार सप्टेंबरपासून रखडवले आहे. संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता, सहअधिष्ठाता आणि उपअधिष्ठाता हे निधी उपलब्ध असतानाही अडवणूक करतात. त्यामुळे या कर्मचाऱयांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे, याकडे सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.