शिवसेनेचा वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेला ‘दसरा मेळावा’ दादर येथील शिवतीर्थावरच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दसरा मेळाव्यासाठी रीतसर परवानगी देणारे पत्र महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून तमाम शिवसैनिकांचे लक्ष मेळाव्याकडे लागले आहे.
दरवर्षी दसऱया दिवशी होणारा शिवसेनेचा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत असतात. या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी हा मेळावा होत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीला सुरुवातही करण्यात आली आहे
अशा राहणार अटी-शर्ती
– दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी 500 रुपयांच्या शुल्कासह 20 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालनही करावे लागणार असल्याचे परवानगीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
– शिवाय मुख्य अग्निशमन अधिकाऱयांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल इंजिनीयरचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मेळाव्यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत वेळ राहणार असून पालिकेच्या अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे.
– विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यास स्थानिक निवडणूक अधिकाऱयाचे ना- हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी अधिपृतपणे परवानगी देणारे पत्र पालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित अंबी यांनी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांना दिल्याचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी सांगितले.