
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत शिवसेना भवन येथे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा जाहिर केला. भविष्यात मुंबईला विकासाच्या पथावर नेण्यासाठी, जागतिक स्तरावर मुंबईचं महत्त्व टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज ठाकरे यांनी महापौर पदावरून हिंदू, मराठी असा शाब्दिक खेळ करणाऱ्या भाजपवर हल्ला चढवला. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असेही राज ठाकरे यांनी ठणकावले.
पेशव्यांच्या काळामध्ये गायकवाड, शिंदे आणि होळकर ही तीन संस्थानं उभी राहिली होती. गायकवाड हे बडोद्याचे महाराज होते. बडोद्यामध्ये मराठेशाहीचे साम्राज्य उभे राहिले. मग त्या गुजरातमध्ये सगळे महापौर गुजराती का होतात? असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे. इथल्या प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसले हिंदू, मराठी करताय तुम्ही? आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल, तो मराठीच होणार, असे राज ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी महाराष्ट्राचे यूपी, बिहार करत आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे, त्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्र वेगळा, सुसंस्कृत आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे अशा प्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्रातील येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे राजकारणात येऊ इच्छितात त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे.
त्यांना असे वाटत असेल की आम्ही सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, तर त्यांचा हा भ्रम दूर झाला पाहिजे. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल तेव्हा आपण काय करणार आहात याचा विचार सत्ताधाऱ्यांनी त्या-त्या वेळी करणे गजरेचे असते. आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना याचे भान राज्यकर्त्यांकडून सुटले, तर पुढे काय होते हे आज आपण पाहतोय. राज्यातील लोकांनी याचा विचार करणे आवश्यक आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आला तेव्हा काँग्रेसने हे केले ते केला सांगता, पण उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहे, त्याच्या दामदुप्पटीने पुढे सुरू होईल तेव्हा कुणाकडे तक्रार करू नका, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या होत्या. त्या विरोधात भाजप सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आता त्यांचे महाराष्ट्रातील गोष्टींबद्दल काय म्हणणे आहे? पश्चिम बंगालमध्ये चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करता, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.


























































