… तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर निशाणा साधला.

”सुशिक्षित मतदारसंघाचे वेगळे प्रश्न असतात. सर्व सामन्य मतदारांना जे प्रश्न असतात त्या प्रश्नासोबतच यांचे काही वेगळे प्रश्न असतात. शिकल्यानंतर, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय हा मोठा प्रश्न असतो त्यांच्यासमोर. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. मुंबईतील पदवीधर मतदारांना आवाहन करत आहे. जसे तुम्ही पाच टर्म तुमचे आशीर्वाद मतांच्या रुपाने शिवसेनेला दिलेले आहेत. ते नाते आपण अधिक दृढ करू. तुमच्या समस्या आम्ही प्रामाणिकपणे दूर करू. या वेळेलाही तुम्ही शिवसेनेला मत द्या. 26 जूनला निवडणूक आहे. त्या दिवशी सुट्टी नाहीए . कार्यालयात जाण्यापूर्वी शिवसेनेला मतदान करून मग कामाला जावं. ही हात जोडून विनंती करतो”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदवीधर मतदारांना केलेले आहे.

मोहन भागवत यांनी मणिपूरवरून केलेल्या वक्तव्यावरून तसेच जम्मू कश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यांबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ” जम्मू कश्मीरमध्ये सतत हल्ले सुरू आहेत. कुठे गेले ते अब की बार वाले. आता का तिथे जात नाहीत? कुणाची जबाबदारी आहे ही. मोहन भागवत यांनी वर्षभरानंतर मणिपूरवर वक्तव्य केलं. मणिपूर जळतोय असं ते बोलले मात्र अद्याप प्रधाननमंत्री, गृहमंत्री तिथे गेले नाही. त्यावर अद्याप काहीही बोलले देखील नाही. कश्मीरमधून 370 कलम हटवल्याचा प्रचार केला. मात्र त्यानंतर काय फरक पडलाय कश्मीरमध्ये. लोकांचे जीव जातच आहेत. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलंय. त्यानंतर तीन दिवसांत तीन हल्ले झाले. अजुनही मोदी तिथे जाणार नाही का ? अजुनही मोदी प्रतिपक्षाला संपवण्यात आनंद मानत असतील. आणि त्यांना हे सर्व सांभाळलं जात नसेल तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.

”मोहन भागवत जे बोलेल त्याला प्रधानमंत्री गांभिर्याने घेणार आहेत का? नाहीतर भाजप अध्यक्ष नड़्डा म्हणालेच आहेत की त्यांना आता संघाची गरज राहिली नाही. संघ हा पाया मानला जातो. त्यांची सुद्धा आता भाजपला गरज राहिलेली नाही. मोहन भागवत यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याने व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री कश्मीरमध्ये मणिपूरमध्ये जाणार आहेत का? आता कश्मीर पुन्हा पेटले आहे. काश्मीरच्या बाबतीत 370 कलम काढलं असे प्रचारात ढोल बडवले गेले. पण प्रत्यक्षात ते काढलेलं नाही. ते कलम राखून ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधानांचा शपथविधी सुरू असताना कश्मीरमध्ये लोकांचे जीव जात आहेत. सुरक्षा रक्षकांवर हल्ले झाले. आता तरी त्यावर काही बोलणाप की फक्त तुमचे ढोल बडवत राहणार आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदर्य रतन शारदा यांनी भाजपाला चपराक लगावणारा एक लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’मध्ये लिहला आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची किंमत कमी झाल्याचे खडे बोल या लेखातून भाजपला सुनावण्यात आले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ”ऑर्गनायझरमधून संघाने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. देशातल्या मतदारांनी भाजपला खडे चारले आहेत. आता तरी भाजप सुधारणार का? की आताही देशातील प्रतिपक्षांना संपवण्याचे काम करत राहणार. प्रतिपक्ष लोकांचे प्रश्न संसदेत विधानसभेत मांडत असतो. त्या प्रतिपक्षालाच जर मोदीजी संपविण्याच्या मागे लागणार असतील तर हे सरकार कुचकामी आहे”

अनिल परब यांनी त्यांच्या वचननाम्याच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा त्यांचे मतदार असा उल्लेख केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मतदार उल्लेख केल्याबद्दल अनिल परब यांचे आभार मानले. ”मी अनिल परब यांचे माझा मतदार असा उल्लेख केला त्यासाठी आभार मानतो. यावरून माझी पदवी खरी आहे हे सिद्ध होतेय”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.