
महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराविरुध्द आज राज्यभरात वणवा भडकला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन झाले. भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा आसूडही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर कडाडला. फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत. राज्यात पाशवी बहुमत आणि दिल्लीत बापजादे बसले असतानाही फडणवीस यांना भ्रष्ट मंत्र्यांना काढता येत नाही, त्यांची कीव येते, त्यांच्यावर दबाव आहे तरी कोणाचा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी होईपर्यंत आंदोलनाची मशाल धगधगत राहणार, असा खणखणीत इशाराही त्यांनी दिला.
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर आयोजित जनआक्रोश आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो शिवसेनेतच आहे. म्हणून राज्याच्या प्रत्येक जिह्यात भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.
दिल्लीत इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चा काढला आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना रस्त्यावर उतरली. भाजपच्या जुलूमशाहीविरुद्ध जनतेला आता रस्त्यावर उतरावेच लागेल. ती फक्त नेतृत्व कोण करतेय, याची वाट पाहतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले तर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो अशी परंपरा आहे. आपणही मुख्यमंत्री असताना महिलांसंबंधी आरोप असणाऱ्या वनमंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याला वनवासात पाठवले होते. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शोभा फडणवीस, महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शशिकांत सुतार, रवींद्र माने या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्यांचे राजीनामे घेतले गेले होते. जनतेच्या मनात संशय आहे त्यामुळे राजीनामे द्या, चौकशीला सामोरे जा, निर्दोष ठरलात तर पुन्हा मंत्रिमंडळात घेईन असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या वेळी बजावले होते. याला म्हणतात जनताभिमुख सरकार. तसे जनताभिमुख सरकार आता नाहीच आहे. आताच्या सरकारचे फक्त पैसे गिळणारे मुख आहे, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी डागले.
विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार अनिल परब यांनी विधिमंडळात पुराव्यानिशी महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांची लक्तरे वेशीवर टांगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपची परंपरा पुढे चालवणारे असतील, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करतील असा विश्वास होता, पण त्यांनी केवळ समज दिली असे सांगितले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुढच्या वेळी रमी नको खेळू तीन पत्ते खेळ, पुढच्या वेळेला बॅग उघडी ठेवू नको, पुढच्या वेळेला सावलीत डान्सबार नको भर उन्हात डान्सबार कर, अशी समज फडणवीसांनी दिल्याचा मिश्कील टोला त्यांनी लगावला. पाशवी बहुमत आहे आणि वर दिल्लीत बापजादे बसलेत तरी देवेंद्र फडणवीस यांची भ्रष्ट मंत्र्यांना काढण्याची हिंमत होत नाही. फडणवीस यांची कीव येते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीसांनी कदाचित स्वतः काही भ्रष्टाचार केला नसेल मग भ्रष्ट मंत्र्यांसाठी बदनामी का ओढवून घेत आहेत, असा सवालही त्यांनी केला. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडे अध्यक्ष बनवायला माणूस नाही, तसेच फडणवीसांकडे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे घ्यायला माणसे नाहीत का? कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर? असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. भ्रष्टाचार पटत असेल तर फडणवीसांनी जाहीर करावे, मग महाराष्ट्रातील जनता आणि ते भ्रष्टाचारी आहेत. नसेल तर सांगावे की, काढायचे आहे, पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी स्थिती आहे.
या वेळी व्यासपीठावर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक राऊत, शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, ऍड. अनिल परब, सुनील प्रभू, उपनेते विनोद घोसाळकर, विशाखा राऊत, उपनेते-आमदार सचिन अहिर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, साईनाथ दुर्गे, शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई, आमदार महेश सावंत, मनोज जामसुतकर, संजय पोतनीस, बाळा नर, हारुन खान, सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, महिला आघाडी संघटक श्रद्धा जाधव, माजी आमदार विलास पोतनीस, नितीन नांदगावकर आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडा जरी स्वाभिमान, अभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव पाहू नका, दबाव झुगारून द्या, भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा नाहीतर खालून जनतेचा दबाव वाढला तर पळताभुई थोडी होईल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधूसंतांचा महाराष्ट्र असे आपण दरवेळेला सांगतो. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो. असा हा गौरवशाली व अभिमान वाटणारा महाराष्ट्र भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय. भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, तर विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत आहे, या गोष्टीची लाज वाटते!
भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणी करत शिवसेनेने सोमवारी आंदोलनाचा दणका दिला. भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात जनआक्रोश उसळला. मुंबईत दादर शिवतीर्थ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट आंदोलन झाले. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल परब, सुनील प्रभू, उपनेते विनोद घोसाळकर उपस्थित होते.
चाय पे चर्चा नको, भ्रष्टाचारावर चर्चा करा
2014 मध्ये मोदींनी चाय पे चर्चा केली होती. तसेच शिवसैनिकांनीही महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा करावी. सलूनमध्ये बसा, रेस्टॉरन्टमध्ये बसा… भ्रष्टाचारावर चर्चा करा. भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत शिवसेनेचे आंदोलन थांबणार नाही. गणेशोत्सवही आला आहे. त्यामध्येही महायुतीचा भ्रष्टाचार दाखवा, असे निर्देश या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.
‘भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. तो धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटावर निशाणा साधला. मिंधे बिनडोक्याचे आहेत, त्यांना नुसते पाय आहेत सुरतेला आणि गुवाहाटीला पळून जायला, त्यांची डोकी नाहीत खोकी आहेत, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
जगदीप धनखड कुठे आहेत?
भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध पुरावे देऊनसुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना तत्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवलेत? जगदीप धनखड कुठे आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, धनखड यांनी राजीनामा का दिला त्याचे कारणच समोर आलेले नाही. ते सरकारविरोधात कारस्थान करत असल्याचा संशय आल्याने त्यांना गायब केल्याचे दिल्लीत समजले. मग धनखड यांना समज का नाही दिली, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. चीनमध्ये सरकारविरोधात कोणी बोलले तर तो माणूस अदृश्य होतो. राजीनामा दिला असला तरी धनखड आहेत कुठे? तब्येत बिघडली असेल तर कोणत्या रुग्णालयात आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतोय? की भाजपने थेट त्यांचे ऑपरेशन केले आहे? धनखडांचे नेमके झाले काय? अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सरकारला जाब विचारला.