नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा, रोजगारात भूमिपुत्रांना प्राधान्य मिळालेच पाहिजे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या, नोकरभरतीत भूमिपुत्रांनाच प्राधान्य द्या अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विमानतळावर आज धडक दिली. भूमिपुत्रांची फसवणूक कराल तर याद राखा, आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ (बाळ) माने आणि शिवसेना उपनेते बबन पाटील यांनी दिला. यावेळी शिवसैनिकांनी अदानी समूहाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारने कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही | मागणी शिवसेनेसह भूमिपुत्रांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. तसा प्रस्तावही राज्य सरकारने केंद्राला पाठवला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून केंद्र सरकार फक्त वेळकाढूपणा करीत आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेने आज विमानतळाच्या साईटवर धडक दिली. पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी नवी मुंबई विमानतळाच्या गेटवर अडवला. या आंदोलनात संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महानगर संघटक लीना गरड, जिल्हा युवाधिकारी पराग मोहिते, अवचित राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

दिबांचे मोठे योगदान

प्रकल्पग्रस्तांच्या विकासामध्ये फार वैगदान आहे. त्यामुळे या भूमीत उभ्या राहिलेल्या विमानतळाला त्यांचे नाव दिलेच गेले पाहिजे. या विमानतळात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी आणि रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी उपनेते बबन पाटील यांनी करून प्रकल्पग्रस्तांना गृहित धरू नका, सिडको आणि सेझविरोधात झालेल्या आंदोलनाचा बारकाईने अभ्यास करा असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

निवेदन दिले नाही

विमानतळावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाची चर्चा कंपनीचे प्रमुख अधिकारी कॅप्टन शर्मा यांच्याबरोबर होणार होती. मात्र शिवसैनिकांच्या रुद्रावतार पाहून ते चर्चेसाठी आले नाहीत. त्यामुळे मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाही. अदानी समूहाच्या या मग्रुरीचा जाहीर निषेध करून त्यांना इशारा देत आहोत असे शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ (बाळ) माने यांनी ठणकावले.