
‘‘उपराष्ट्रपती पदाची लढाई ही केवळ प्रतीकात्मक नाही. ती सत्य, न्याय आणि संविधानाच्या संरक्षणाची लढाई आहे. ही लढाई लढताना आकडय़ांच्या ताकदीवर जाण्याची गरज नाही. ताकद पांडवांचीही कमी होती, पण तरीही कौरव हरले. कारण पांडवांकडे सुदर्शन होते. आज आपल्याकडे सुदर्शन चक्ररुपी सुदर्शन रेड्डी आहेत. त्यामुळे आपण जिंकणारच,’’ असा विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. देशाची ही लढाई लढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे,’’ असे संजय राऊत म्हणाले.
बी. सुदर्शन रेड्डी यांच्या समर्थनार्थ ऐतिहासिक सेंट्रल हॉलमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. ‘‘देशातील परिवर्तनाचे वादळ बिहारमध्ये सुरू होऊन दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आपली ताकद वाढली आहे. सुदर्शन तर आपल्याकडे आहेतच, आता फक्त जिगर हवी. देशासाठी, लोकशाहीसाठी, संविधानासाठी एका व्यासपीठावरून एकमताने आणि एका मनाने ही लढाई लढू आणि जिंकू. संसदेच्या दोन्ही सभागृहांत लोकशाहीची आज जी हत्या होतेय, ती रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करू,’’ असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला.