वाड्याचा गड जिंकणारच! शिवसेनेच्या मेळाव्यात निर्धार

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वाडा तालुक्यात जोरदार तयारी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्व निवडणुका ताकदीने लढवून वाड्याचा गड जिंकायचा आणि भगवा फडकवायचा, असा निर्धार मेळाव्यात शिवसैनिकांनी केला.

मंगळवारी वाडा येथील ब्लॉसम रिसॉर्ट येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. तर आगामी सर्व निवडणुकांत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरून जिंकेल, असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख कुंदन पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख कांतीलाल देशमुख, माजी सभापती अस्मिता लहांगे, माजी नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, तालुकाप्रमुख नीलेश पाटील, शहरप्रमुख प्रमोद घोलप, माजी नगरसेविका वर्षा गोळे, आशा भोसले, शाम पष्टे, दौलत पाटील, खानिवली सरपंच भरत हजारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.