शिवसेना ही शेतकऱ्यांची शेवटची आशा आहे!

2641

शेतकरी संकटात आह़े वाया गेलेल्या पिकाला कवटाळून शेतकरी रडत आहे. अशा परिस्थितीत सत्तेच्या खेळात मशगूल राहणं हे पाप ठरेल. शिवसेना ही शेतकऱ्यांचीशेवटची आशा आहे. एवढय़ा संकटातही हा शेतकरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा हे सांगतोय. अशा परिस्थितीत शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचा विश्वास सार्थ ठरवायला हवा. प्रत्येक गावात शेतकरी मदत केंद्र सुरू करून शेतकऱयांच्या समस्या सोडवा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.

अवकाळी पावसामुळे राज्यभरातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. या परिस्थितीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दौरे करून या नुकसानीचा आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावून त्यांना शेतकऱयांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाचं दुष्टचक्र थांबण्याची लक्षणं नाहीत. पाणी एवढं पडतंय की शेततळं नव्हे तर शेत म्हणजेच तळं झालेलं आहे. इतकं पाणी शेतात असताना आता रब्बीची पेरणी करता येत नाही. या शेतकऱयांचा प्रक्षोभ बघितल्यानंतर हृदय गलबलतं. अशा शेतकऱयांना बी-बियाणे, खतांची मदत पोहोचणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सध्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे ती पिके काढण्यासाठी शेतकऱयांना मनरेगाच्या माध्यमातून मदत करा.

घोषणांचा ओला दुष्काळ झाला आहे

शेतकऱयांची अडचण केवळ नुकसानभरपाईपुरती मर्यादित नाही तर पीकविम्याचे पैसे शेतकऱयांना मिळालेले नाहीत. जाहीर करण्यात आलेलं 432 कोटींचं दुष्काळी अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱयांना कर्जमाफी मिळालेली नाही. मागील पाच वर्षांत केवळ घोषणाच झाल्या असून हा घोषणांचा ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. या तुंबलेल्या घोषणांचं पाणी झिरपत नसल्याचा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शेतकऱयांचा विश्वास सार्थ ठरवा

शेतकऱयांना न्याय मिळवून देणारी अशी शिवसेनेची ओळख आहे. शेतकऱयांच्या न्याय्य हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरत आहोतच. शेतकऱयांनी त्यांच्या दुःखातही शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. या परिस्थितही शिवसेनेचा मुख्यमंत्री यायला हवा हे शेतकरी सांगतोय. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवायला हवा. आता त्यांच्या पाठीशी कुणी नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रत्येक गावात शाखा आणि मदत केंद्र

गावागावांत शिवसेनेच्या शाखा आणि त्या शाखांमध्ये शेतकऱयांसाठी मदत केंद्र तयार करा. गावागावांत गटप्रमुख नेम़ा या गटप्रमुखांना शेतकऱयांपर्यंत पोहोचू द्यात. मदत केंद्रांचे जिऑटॅग केलेले फोटो मला पाठवा. शेतकऱयांना कुठेही हेलपाटे घालायला न लावता शिवसैनिक त्याच्यापर्यंत पोहोचायला हवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या