
सामना प्रतिनिधी । मालवण
खड्डे बुजवण्याचे काम दर्जाहीन करणाऱ्या ठेकेदाराला शिवसेनेने दणका दिला आहे. मालवण शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या देऊळवाडा ते कचेरी रोड या मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम दर्जाहीन असून बुजवलेले खड्डे पावसात वाहून गेले. अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. याची माहिती मिळताच शिवसेना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तात्काळ कामाची पाहणी केली. दरम्यान जोपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशा लेखी सूचना सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांना दिल्या आहेत.
यावेळी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, दीपक पाटकर, जगदीश गावकर, राजू परब, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी पी. डी. पाटील उपस्थित होते.
शहरातील देऊळवाडा ते कचेरी रोड या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसात या खड्ड्यात पाणी साचते याचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. या खड्ड्यांच्या समस्यांसदर्भात नागरिकांनी आवाजही उठविला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार शहरातील देऊळवाडा ते कचेरी रोड या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. मात्र हे काम बोगस असल्याची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी देऊळवाडा येथे जात पाहणी केली. जोपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम चांगल्या दर्जाचे होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशा सूचना त्यांनी बांधकामच्या अधिकार्यांना दिल्या.




























































