
वाढती महागाई, महिलांवरील अत्याचार, लाडक्या बहिणींची सरकारकडून होणारी फसवणूक आदी अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीने आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारोंच्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या वेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. महिलांसंदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस पावले उचला, अशी मागणी त्याद्वारे करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी आज दुपारी 3 वाजता महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वांद्रे पूर्व येथील चेतना महाविद्यालयासमोर जमले. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर आदींनी त्यांना मार्गदर्शन करताना महायुती सरकारवर चौफेर टीका केली. निवडणुकीत मते मिळवण्याच्या हेतूने ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांची फसवणूक सरकारने केल्याबद्दल निषेध नोंदवण्यात आला. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील महिलांच्या समस्यांचा आलेख उंचावत चालला असूनही विद्यमान सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा संताप व्यक्त करण्यात आला. या वेळी उपस्थित महिलांनी सरकारला जाब विचारणारे ‘आरोग्याचं राजकारण थांबवा, गर्भवती महिलांना नीट उपचार द्या’, ‘महागाईने केलं आमचं घर रिकामं, त्यातून सत्ताधाऱयांनी थाटली दुकानं’ असे फलकही झळकावले गेले. तसेच जोरदार घोषणाही देण्यात आल्या. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे चेतना महाविद्यालय परिसर भगवामय झाला होता.
चेतना महाविद्यालयाकडून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. तिथेही जोरदार घोषणा देण्यात आल्या. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीचे भान राखत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर शिवसेना उपनेते, आमदार आणि महिला आघाडी विभाग संघटनांच्या शिष्टमंडळाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
याप्रसंगी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत, सुषमा अंधारे, शीतल शेठ-देवरूखकर, ज्योती ठाकरे, अस्मिता गायकवाड, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, रंजना नेवाळकर, शुभदा शिंदे, मनाली चौकीदार, शालिनी सावंत, अनिता बागवे, रजनी मिस्त्री, मनीषा नलावडे, राजराजेश्वरी रेडकर, प्रज्ञा सकपाळ, पद्यावती शिंदे, युगंधरा साळेकर, आदी उपस्थित होते. शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, वरुण सरदेसाई, महेश सावंत, बाळा नर यांनीही यावेळी उपस्थित राहून महिला आघाडी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.
याकडे वेधले लक्ष…
सरकारने लाडक्या बहिणींना 2100 देण्याचे वचन दिले होते; परंतु 2100 तर सोडा पूर्वीप्रमाणे 1500 रुपये महिनादेखील वेळेवर मिळत नाहीत.
लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिफॉर्म 50 रुपये देण्याचा अध्यादेश काढूनही त्यांचे पैसे आजतागायत वितरित
करण्यात आलेले नाहीत.
– सरकारी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांसाठी अॅम्ब्युलन्स व इतर उपचारांची सोय नाही, दुर्गम भागात तर गरोदर महिलांना झोळीतून हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ येत आहे.
– आर्थिकदृष्टय़ा दुर्बल मुलींसाठी मोफत शिक्षण व उच्च शिक्षणाची सोय करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
-उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना अजूनही लाभ मिळालेला नाही. पण त्याच्या जाहिरातींवर मात्र करोडोंची उधळण झाली.
– बलात्कार, विनयभंग, बाल शोषण यासारखे गुन्हे वाढले आहेत.
– घरगुती गॅस, तूरडाळ, तेल यांचे भाव गगनाला भिडत आहेत.
– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत किती महिलांना लाभ मिळालेत याची आकडेवारी सरकार द्यायला तयार नाही.