
चारचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा असते. मात्र हजारो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या रिक्षा, टॅक्सींना पार्ंकगसाठी अधिकृत व्यवस्था नसते. त्यामुळे त्यांना सातत्याने दंड भरावा लागतो. दुचाकींसाठीही तशी काहीच व्यवस्था नाही. त्यामुळे रिक्षा, टॅक्सींना पार्ंकगची सुविधा पुरवा आणि पार्ंकगसाठी दुचाकीस्वारांनाही दिलासा द्या, अशी मागणी शिवसेना आमदारांनी आज विधान परिषदेत केली. सरकारने त्याला ग्रीन सिग्नल दिला असून त्यासंदर्भात अभ्यासगट स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्यात वाहतूक पोलिसांकडून ई-चालान तयार करण्यासाठी खासगी मोबाईल फोनचा वापर करण्यात येत असल्याबद्दल शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मुंबईतील पार्किंगच्या समस्येकडे लक्ष वेधले. मुंबईसारख्या शहरात आजही अनेक चाळी, इमारती आणि झोपडपट्टी भागात नव्या टॉवर्सप्रमाणे पार्ंकगची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना त्यांची वाहने रस्त्याकडेला पार्क करावी लागतात. त्या वाहनांवर कारवाई करू नये अशा सूचना वाहतूक पोलिसांना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
रिक्षा आणि टॅक्सीवाले पार्किंग नसल्याने आपल्या घराजवळच गाडय़ा उभ्या करतात. ते त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे, मात्र टॅक्सी, रिक्षावाल्यांना त्यासाठी महिन्याला पाच-सहा वेळा दंड आकारला जातो. मिळालेले उत्पन्न दंड भरण्यात गेले तर ते जगणार कसे, असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. वरिष्ठ अधिकाऱयांशिवाय इतर कुणीही चालान कापू नये असा नियम सरकारने बनवावा, अशी सूचना त्यांनी मांडली.
वाहतूक पोलिसांनी दंड आकारूनही दंड भरला जात नाही अशा वाहनचालकांना पेट्रोल मिळणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी, अशी सूचना मनीषा कायंदे यांनी केली. काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि भाई जगताप तसेच भाजपच्या प्रसाद लाड यांनीही चर्चेत भाग घेऊन सूचना मांडल्या.
अभ्यासगट स्थापन करणार
वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना ई-चालान देण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, मुंबईच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दुचाकींचा विचार झालेला नाही. त्यात बदल करता येईल का हे तपासून पाहिले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
वाहतूक हवालदारांना कॅमेरा
वाहन चालकांना ई-चालानचा संदेश तातडीने मिळेल यासाठी यंत्रणा अद्ययावत केली जाईल. ठराविक कालावधीनंतर प्रलंबित दंडाची वसुली करता येत नसल्याने लोकअदालत घेऊन तडजोडीने 50 टक्के दंडाची वसुली केली जाईल. वाहतूक हवालदारांना कॅमेरा देण्याबाबत विचार सुरू असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.
ऍम्ब्युलन्स रखडताहेत, जीव वाचवा, वाकोल्यातील कोंडीवर उपाययोजना करा
मुंबईतील वाहतूककोंडीचा विषय शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विशेष उल्लेखाद्वारे वांद्रे आणि खार परिसरातील वाहतूककोंडीकडे सरकारचे लक्ष वेधले. वाकोल्यातील वाहतूककोंडीमुळे ऍम्ब्युलन्स रखडताहेत, तातडीने उपाययोजना करा आणि जीव वाचवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावरील वाकोला उड्डाणपुलावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते खड्डे आणि मेट्रो व उड्डाणपुलाच्या कामांमुळे तिथे वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू असते. त्यामुळे वाकोला उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी-लिंकपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात, अशी वस्तुस्थिती मिलिंद नार्वेकर यांनी मांडली. कोस्टल रोडमुळे नरीमन पॉइंट ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होतो. परंतु पुढे वांद्रे ते वाकोला उड्डाणपूल हे अंतर कापण्यासाठी प्रचंड वाहतूककोंडीमुळे वाहनांना तब्बल एक तासाचा अवधी लागतो याकडे त्यांनी लक्ष वेधले.


































































