शिवमंदिरांच्या राज्यात-  चंपावती नगरीतलं शिवसाम्राज्य

>> नीती मेहेंदळे

चंपावती हे चौलचं विष्णुपुराणातलं नाव. पण त्याचे भौगोलिक संदर्भ जुन्या नव्या नकाशांशी मेळ घालताना जुळत गेले. या पौराणिक नावांशिवाय चेमुल, तिमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोलो, सैमूर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अनेकविध कालखंडात निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असलेलं प्राचीन बंदराचं गाव म्हणजे अलिबागजवळचं चौल.

चौल– रेवदंडा जोडीची पुराणातली ओळख चंपावती-रेवती. चंपक म्हणजे चाफा. चाफ्याची अनेक झाडे असलेला भाग तो चंपावती. याला आधार म्हणून आजही गावात जागोजागी असलेली निरनिराळ्या जातींची चाफ्याची झाडे. काहींच्या मते इथे वापरल्या जाणाऱया ‘चंपा’ नावाच्या मासे पकडण्याच्या जाळीवरून किंवा चंपा नावाच्या राजावरून हे चंपावती नाव पडले. रेवती हे रेवदंडय़ाचे नाव म्हणे श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामाच्या बायकोच्या नावावरून पडले. रेवदंडा त्यावेळच्या चौलचाच तुकडा जो कालांतराने वेगळा काढला गेला.

चौल म्हणजे प्राचीन काळात शंभरावर मंदिरं असलेलं गाव. त्यात शिवमंदिरंच खूप. आजही पार त्या हटाळेच्या नागेश्वरापासून सराईतल्या सोमेश्वरापर्यंत विखुरलेली दिसतात. भीमेश्वर, वंखनाथ, रामेश्वर मोठय़ा खोल पोखरणी थाटून बसले आहेत. एक पाऊस पडून गेला की त्या भरतात आणि गावातल्या मुलांची त्यात डुंबायची अहमहमिका लागते. पोखरणीबाहेर रस्त्यापलीकडे असलेली भव्य दीपमाळ ही वंखनाथाची दुरून नजरेस पडणारी खूण.

मल्लेश्वराची एक जुनी गंमतीशीर घटना. एक अतिशय वृद्ध आजी गाभाऱयात बसून काही जप करत होत्या. मी निघतेय पाहून लगबगीने त्याही उठल्या. मला जरा हा रस्ता ओलांडून दे म्हणाल्या. मी वर्तक, हे समोरचं एकमजली जुनं घर आमचं. लहानपणापासून मी इथे आहे. पार खेळायलाही येत असू इथे मल्लेश्वरापाशी. असं सहज प्राचीनत्व सांगणारी ही सगळी मंदिरं. यांची बांधणी खास कोकणातल्या मंदिरांसारखी. लाल कौलारू. कळस असेल किंवा नसेल. त्यांचे आतले खांब, देवकोष्ठातल्या मूर्तींची घडणावळ, भव्य पिंडी हे सगळं त्या मंदिरांचा काळ सांगू पाहतं.

मुख्य रस्त्यापासून जरा आड असलेल्या कुंडेश्वराच्या देवळातलं शिवलिंग चांगलं भलंथोरलं आहे आणि त्याच्या मागच्या बाजूला अनेक पाषाणातील मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या दिसतात.

चौलमध्ये भटकायला लागलं की, गावातले लोक सर्वप्रथम रामेश्वर मंदिरात घेऊन येतात. हे चौलमधलं सर्वात देखणं मंदिर सांगितलं जातं. चौलचं ग्रामदैवत! उतरत्या कौलारू छताचे मंदिर, पुढय़ात नंदीमंडप, दीपमाळ आणि रेखीव तीन पुष्करणी! कोकणातील मंदिर वास्तुशैलीचा हा उत्तम नमुना म्हणता येईल. मूळ मंदिराची निर्मिती कधी-कोणी केली याची माहिती मिळत नाही, पण मराठेशाहीत नानासाहेब पेशवे, मानाजी आंग्रे, विसाजीपंत सुभेदार यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे तपशील मिळतात. या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली पर्जन्य, वायू आणि अग्नी अशा नावांची तीन कुंडे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की ‘पर्जन्य’, वारा पडला-गदगदू लागले की ‘वायू’ आणि थंडी-गारठा वाढला की उर्वरित ‘अग्नी’कुंड उघडायचं. गावातील वातावरणातल्या उणिवा ही कुंडं भरून काढतात. याच्या नोंदी तपासल्या तर पाऊस लांबल्याने आजवर यातील पर्जन्यकुंड 1731, 1876 आणि 1941 मध्ये उघडल्याच्या आणि त्या त्या वेळी चौलवर पाऊस पडल्याची माहिती मिळते. गावांमधल्या या श्रद्धा आणि शास्त्र्ा यांची सांगड नेहमी पाहण्यासारखी असते. चौलमध्ये रामेश्वराशिवाय अन्यही काही मंदिरे आहेत. रामेश्वराला जाणाऱया गल्लीच्या तोंडाशी मुखरी गणपतीचं प्रशस्त देऊळ आहे. शिवपिंडीच्या आकाराचं कैलासपतीचं मोठं बहरलेलं झाड आहे, ज्याचा सुगंध आपल्याला रामेश्वरापर्यंत सोबत करतो.

याव्यतिरिक्त मासेश्वर म्हणजेच म्हसोबा, खंडोबा, सराईतलं सोमेश्वर हे अगदी चौलच्या हद्दीतलं शेवटचं मंदिर. ताडकेश्वर हे कोळी वस्तीतलं ताडाच्या खोडातून आलेलं स्वयंभू मंदिर. तुलेश्वर, पांचाळेश्वर ही रेवदंडा भागातली. रेवदंडा आणि नागाव -आक्षी हा भागसुद्धा पूर्वी चौल प्रांताचाच असणार. नागाव -हटाळे भागातलं प्राचीन मंदिर म्हणजे नागेश्वराचं ज्याच्यासमोर हटाळेचं मोठं तळं आहे.

हरेश्वर हे नागावच्या किनाऱयानजीकचं खूप जुनं शिवमंदिर त्याच्या शेजारच्या दत्तमंदिराच्या लेखावरून ते बाराव्या शतकातलं आहे असं समजतं.

चौलवर शिलाहार, सातवाहन, मराठा इत्यादी राजवटींनी राज्य केलं होतं. सातवाहनकालीन काही बांधकामाचे आणि वस्तूंचे अवशेष इथल्या उत्खननांमध्ये मिळाले आहेत. हे प्राचीन बंदर असल्याने हा व्यापारी मार्ग होता आणि याचा पुरावा म्हणजे जवळच टेकडीवर असलेली हिंगुलजा बुद्ध लेणी. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातलं चौल हे एक नावाजलेलं क्रियाशील बंदर होते याचे पुष्टी देणारे बरेच ठोस पुरावे आहेत. अलीकडे डेक्कन कॉलेजने केलेल्या उत्खननांमधून चौल हे दोन अडीच हजार वर्षे जुनं बंदर होतं हे सिद्ध झालंय. आपलं मराठमोळं चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले शहर होते हे सिद्ध झालंय ही अभिमानाची बाजू.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या