
शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेमध्ये विशेष औद्योगिक प्रदर्शन आणि पोस्टर प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन दुपारी करण्यात आले. यामध्ये शिवाजी विद्यापीठाने गेल्या पाच वर्षांत प्राप्त केलेल्या बौद्धिक संपदा हक्क अर्थात पेटंटची गॅलरी सर्वाधिक लक्षवेधक ठरली.
विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात या प्रदर्शन-स्पर्धेचे दुपारी उद्घाटन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत गतवर्षीप्रमाणे यंदाही अनेक स्थानिक उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले आहेत. यामध्ये अभिनव स्टार्टअपपासून ते प्रयोगशील उत्पादक, व्यावसायिक यांचा सहभाग राहिला. येथे एकूण 20 स्टॉल आहेत.
यामध्ये डॉ. गजानन राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) कक्षाच्या वतीने गेल्या पाच वर्षांत विद्यापीठाने प्राप्त केलेल्या विविध पेटंट प्रमाणपत्रांची गॅलरीही मांडण्यात आली आहे. ही प्रमाणपत्रे पाहण्यासाठी जिज्ञासू संशोधक विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. ही गॅलरी अभिनव आणि दर्जेदार संशोधनासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास डॉ. राशिनकर यांनी व्यक्त केला.
तसेच वीज बचत उपकरणे, औद्योगिक उपकरणे, सौर उपकरणे, आधुनिक लॉकर्स, कॉफी विथ सी.ए., स्टार्च थ्री-डी प्रिंटींग, सेंद्रिय खाद्यपदार्थ इत्यादींचेही स्टॉल आहेत.
परिषदेत आज देशविदेशांतील तज्ञांनी महत्त्वाच्या विषयांवर मांडणी केली. यामध्ये मलेशियाचे डॉ. मोहम्मद याझीद बिन याह्या, डॉ. अहमद इलियास बिन रुश्दान, ऑस्ट्रेलियाचे डॉ. महेश सूर्यवंशी, गिरीश चितळे, डॉ. देवव्रत हर्षे, सचिन कुंभोज, योगेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.


























































