म्हाडाच्या 133 विजेत्यांची हक्काच्या घराची प्रतीक्षा संपल, दिंडोशी खडकपाडातील इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र

म्हाडाच्या खडकपाडा येथील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटी या इमारतीला अखेर भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीला येथील 133 विजेत्यांची गृहस्वप्नपूर्ती झाली आहे. लॉटरी लागून वर्ष उलटले तरी घराचा ताबा कधी मिळणार या प्रतीक्षेत हे विजेते होते.

म्हाडाने गोरेगाव, मालाड, कुर्ला, पवई, विक्रोळी, अंधेरी येथील 2030 घरांसाठी गतवर्षी 8 ऑक्टोबरला संगणकीय सोडत काढली होती. या सोडतीत नव्याने बांधकाम सुरू असलेल्या 1327 घरांचादेखील समावेश होता. निर्माणाधीन इमारतींना ओसी मिळताच गोरेगाव प्रेमनगर, कोपरी पवई आणि दिंडोशीतील शिवधाम कॉम्पलेक्स येथील विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया म्हाडाने सुरू केली. दिंडोशी खडकपाडा येथील शिवनेरी गृहनिर्माण सोसायटी या इमारतीला अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नसल्यामुळे 133 विजेते घराच्या प्रतीक्षेत होते. अखेर या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच पणन विभागाकडून विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यास सुरुवात केली जाणार आहे.