
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा राज्याभिषेक दिन आज संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे व मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना तसेच शिवप्रेमींच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून, मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिव-शाहूप्रेमींची मोठय़ा प्रमावर गर्दी झाली होती. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव‘, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिवकालीन दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी वातावरण शिवमय झाले होते. फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांना साखर-पेढेवाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून व्याख्यानाद्वारे शिवचरित्राचा जागर करण्यात आला. तर, सायंकाळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मंगळवार पेठ येथून पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

























































